देवरूख : सहयाद्री पर्वत रांगांवर वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर स्वयंभू देव व साखरपा येथील गिरीजा देवी यांचा कल्याणविधी (लग्नसोहळा) सोहळा रविवारी हरहर मार्लेश्वर, शिव हरा शिव हरा च्या गजरात हिंदू लिंगायत पध्दतीने सुमधूर मंगलाष्टकांनी दुपारी २ वाजून १५ मिनिटे या शुभमुहुर्तावर राज्यातील लाखो भाविक व प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला.प्रतिवर्षाप्रमाणे मकरसंक्रातदिनाचे औचित्य साधून रविवारी हा विवाह सोहळा (कल्याणविधी) भाविकांच्या अलोट गर्दीच्या उपस्थितीत दुपारी २.१५ वाजता या शुभमुहुर्तावर गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदाह्ण या मंजूळ स्वरात व सनई चौघडे, ताशांच्या वाजंत्रीत उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्याला गोठणे गावची करवली नटून थटून आली होती.
साखरपा येथील वधू गिरीजा देवीची पालखी, मार्लेश्वराची पालखी व सोहळ्याचे यजमान देवरूख येथील वाडेश्वर, मानकरी, पालख्या, दिडींचे व मंडळींचे शनिवारी रात्री मार्लेश्वर पवई येथे आगमन झाले होते. त्यांचे रविवारी सकाळी विवाहस्थळी स्वागत करून ३६० मानकऱ्यांच्या उपस्थितीत कल्याण विधीचा प्रारंभ के ला गेला. धार्मिक कार्यक्रमादरम्यान दुपारी २ वाजता श्री मार्लेश्वर देवाला हळद चढवून कल्याणविधी सोहळ्याला सुरूवात करण्यात आली.यावेळी रायपाटण, लांजेकर स्वामी, म्हसोळी महाराज या तीनही स्वामींना मार्लेश्वर मंदिराजवळ आणून पाद्य पूजा व त्यांना आसनस्थ करून त्रिपूर उजळून दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. कल्याण विधीत मार्लेश्वराची म्हणजेच नवरदेवाची मुर्ती (चांदीचे टोप) आंगवलीचे अणेराव यांनी मांडीवर घेतली होती. गिरीजामाईची मूर्ती लांजेकर स्वामी मांडीवर घेवून बसले होते. हा सर्व सोहळा बसून प्रथेप्रमाणे पार पडला. विवाह सोहळ्याचे पौराहित्य रायपाटणकर स्वामी, पाटगांवचे जंगम यांनी केले.हा विवाह सोहळा धार्मिक विधीनुसार मार्लेश्वर देवतेच्या गुहेसमोरील सभा मंडपात पार पडला. हा विधी पार पडत असताना गुहेतील देवतेला याचे दर्शन घडणे आवश्यक असते व याची यावेळीही काळजी घेण्यात आली होती. या सोहळ्यात मंगलाष्टका या पौराहित्य करणाऱ्यांनी म्हटल्या.
शेवटची मंगलाष्टका कल्याणविधी सोहळ्यासाठी उपस्थित मंडळींनी सामुहिक पणे म्हणून हा सोहळा यादगार केला. यानंतर शिव हरा रे शिव हरा, हर हर मार्लेश्वर, गिरीजा माते की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या सोहळ्यानंतर वधूवरांस आहेर देण्याचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यासाठी लाखो भाविक मारळनगरीत दाखल झाले होते.