लांजा शहरात मंगळवारी भरणारा आठवडा बाजार दुपारी नगर परिषद प्रशासनाने बंद केला. (छाया : अनिल कासारे)
लांजा : तालुक्याच्या ठिकाणी शहरात आठवडा बाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी झाल्याने प्रशासनाने हस्तक्षेप करत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने दुपारी २ वाजता बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही माघारी फिरावे लागले.
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या दृष्टीने सोमवारी लांजा प्रांताधिकारी पोपट ओमासे व लांजा तालुका व्यापारी संघटना यांची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे सांगितले. तसेच नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोमवारी रात्री ८ वाजता लांजा प्रांताधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मंगळवारी शहरात होणारा आठवडा बाजार हा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत बाजार सुरू ठेवण्याचा अचानक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या बाजाराला कोल्हापूर येथून येणारे व्यापारी तोपर्यंत शहरामध्ये दाखल झाले होते. मंगळवारचा शहरातील आठवडा बाजार दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे आठवड्याचा भाजीपाला व अन्नधान्य खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बाजारात उसळलेली गर्दी पाहता, पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, तहसीलदार समाधान गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी मारुती कोरे, नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी बाजारात येऊन दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार राजन साळवीही उपस्थित होते.
चाैकट
बाजार भरायलाच का दिला
आठवडा बाजार असल्याने व्यापाऱ्यांनी लावलेली दुकाने आणि कमी अवधीत बंद करताना त्यांची धावपळ उडाली होती. त्यामुळेच व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली. जर तुम्हाला बाजारपेठ दुपारी २ वाजता बंद करायची होती, तर बाजार भरायला द्यायचा नव्हता, असा सूरही व्यापाऱ्यांनी यावेळी आळवला. कोल्हापूर येथून आलेल्या व्यापाऱ्यांना दुपारीच आपली दुकाने बंद करून माघारी परतावे लागले.