शहरात भाजी खरेदीसाठी कोरोना नियमावलींचे पालन होत नाही. विक्रेते, ग्राहक विनामास्क असतात.
मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे जिल्ह्यातील आठवडा बाजार अद्याप बंद आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आठवडा बाजारांना अद्याप प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, शहरातील नाक्यानाक्यांवर भाजी विक्री सुरू असून, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. भाजी खरेदीसाठी आलेले ग्राहक, तसेच विक्रेत्यांमध्ये हलगर्जीपणा निदर्शनास येत आहे. मास्क ताेंडाऐवजी हनुवटीला अडकविले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील पोस्ट कार्यालय, गोखलेनाका, आठवडा बाजार, बसस्थानक, माळनाका, मारुती मंदिर, साळवी स्टाॅप, कोकण नगर, नाचणे रोड, उद्यमनगर, कुवारबाव परिसरात भाजीविक्रेते स्टाॅल लावत आहेत. भाज्यांसह, कांदा, बटाटा, फळांची विक्री करण्यात येत आहे. खरेदीसाठी येणाऱ्या बहुतांश ग्राहकांना घाई असल्याने खरेदीसाठी रांगेत थांबायला वेळ नसतो. प्रत्येकजण प्रथम आपल्याला भाजी मिळावी, यासाठी घाई करतो. त्यामुळे विक्रेत्यांचीही गडबड उडते. विक्रेते, ग्राहकांकडून मास्क नाका-तोंडाला लावण्याऐवजी हनुवटीला अडकविला जातो. परिणामी संक्रमण कमी होण्याऐवजी वाढण्याचा धोका आहे. गर्दीत जाऊन खरेदी करताना तरी किमान दक्षता घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
साळवी स्टाॅप येथे गर्दी
साळवीस्टाॅप, मारुतीमंदिर परिसरात नोकरदार वर्गाला भाज्या, फळे खरेदी करणे सोयीस्कर ठरत आहे. त्यामुळे परिसरातील विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी होत आहे. आधीच्या ग्राहकाची भाजी खरेदी सुरू असतानाच मागून येऊन अनेक ग्राहक घाई करतात. विक्रेते रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवर ठाण मांडत आहेत. विक्रीवेळी ग्राहक व विक्रेते यांना मास्क लावण्याचा विसर पडत आहे.
जणू बाजार फुलतो
शहराजवळील कोकणनगर परिसरातील नागरीवस्तीत वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा भाजी, फळे, कांदा-बटाटा विक्रेत्यांनी स्टाॅल मांडले आहेत. सकाळी ९ ते ४ या वेळेत विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची होणारी गर्दी पाहता जणू बाजार फुलल्याचा प्रत्यय येत आहे. कोराेना नियमावलींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
कुवारबाव येथे बाजार
कुवारबाव परिसरातही रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते स्टाॅल लावत असून, ग्राहकांची सकाळच्या सत्रात खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता बाजार भरल्याचे जाणवते. कोरोना जणू संपल्याचाच प्रत्यय येतो. वास्तविक, संक्रमण वाढण्याचा धोका असताना त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बाजारातील विक्रेते, ग्राहक विनामास्क आढळल्यास त्यावर कारवाई होत नसल्यानेच फावले आहे.
खरेदीसाठी बाजारात जाणाऱ्या ग्राहकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. शहरातील नाक्यानाक्यांवर पोलीस बंदोबस्त आहे. शिवाय नगर परिषदेची पथकेही बाजारात फिरत असतात. शासकीय नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी वारंवार प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीही मास्क तोंडावरून काढून हनुवटीला अडकवून बाजारातील गर्दीत ग्राहक मिसळतात. वाहनातून भाजी विक्रीसाठी आणणारे विक्रेतेही मास्क वापरणे टाळत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कोरोनामुळे गेले दीड वर्ष आठवडा बाजार बंद आहेत. बाजार सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही; परंतु विक्रेत्यांनी ठिकठिकाणी स्टाॅल लावले आहेत. त्याठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी गर्दी न करता, कोरोना नियमावलीचे पालन करावे, मास्क, सोशल डिस्टन्सिंग गरजेचे आहे. जिल्ह्याचा कोरोना संक्रमण दर काही प्रमाणात खाली आला आहे; परंतु हे प्रमाण शून्यावर येण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष, रत्नागिरी.