लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासनाने दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन घोषित केले. शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. प्रवाशांअभावी रत्नागिरी विभागाच्या वाहतुकीवर सलग दुसऱ्या दिवशी चांगलाच परिणाम झाला. रविवारी दिवसभरात अवघ्या ६५ फेऱ्या सोडण्यात आल्या.
लाॅकडाऊननंतर एसटीची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली असतानाच पुन्हा लाॅकडाऊनचा सामना करावा लागला आहे. मात्र, एस.टी.ला लाॅकडाऊनमधून वगळण्यात आले असले तरी प्रवासी नसल्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे.
रत्नागिरी विभागात ६०० गाड्यांद्वारे दैनंदिन ४२०० फेऱ्या सोडण्यात येतात. एक लाख ८० हजार किलोमीटर प्रवासातून एस.टी.ला ५० लाखांचे उत्पन्न प्राप्त होत आहे. जेमतेम डिझेल खर्च भागत असला तरी स्पेअर पार्टस् व अन्य खर्चासाठी महामंडळाकडून आर्थिक मदत घ्यावी लागत आहे. वीकेंडमुळे शनिवारी दिवसभरात अवघ्या १६० फेऱ्या संपूर्ण विभागातून सोडण्यात आल्या होत्या. १९ हजार ५०१ किलोमीटर इतकाच प्रवास झाला. एस.टी.ला पूर्ण क्षमतेने वाहतुकीला परवानगी दिली असली तरी प्रवासी स्वत:च घराबाहेर पडणे टाळू लागले असल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. रविवारी मात्र ६५ फेऱ्या दिवसभरात सोडण्यात आल्या. त्यामुळे १३ हजार ७०० किलोमीटर इतका प्रवास झाला आहे. दोन दिवसांत फेऱ्यांवर परिणाम झाल्याने एसटीच्या उत्पन्नात घट झाली आहे.