रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे वीकेंडला पर्यटकांच्या हाेणाऱ्या गर्दीत दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. शनिवार, रविवारी फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असून, दाेन दिवसात तब्बल ४० हजार भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतल्याचे सांगण्यात येत आहे.हिवाळा ऋतू हा पर्यटनासाठी उत्तम मानला जात असल्याने पर्यटकांची पावले रत्नागिरीकडे वळली आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, भिशी ग्रुपच्या सहलींबराेबरच शाळा-महाविद्यालयीन सहली जिल्ह्यात दाखल हाेत आहेत. लगतच्या जिल्ह्यातील पर्यटक एक दिवसात परत फिरत आहेत तर काही मुक्कामासाठी येत आहेत. एसटी, टेम्पो ट्रॅव्हलर, जीप, कार इतकेच नव्हे तर दुचाकीवरूनही पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. विशेषत: समुद्र किनाऱ्यावरील ठिकाणांना पर्यटकांची अधिक पसंती मिळत आहे.रत्नागिरीत दाखल हाेणारे पर्यटक गणपतीपुळे, आरे-वारे, रत्नागिरी, पावस, गणेशगुळे, पूर्णगड, जयगड येथेही भेटी देत आहेत. काही पर्यटक जयगड येथून गुहागर गाठत आहेत. तर, काही पूर्णगड करून राजापूर मार्गे सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूरकडे जात आहेत. सध्या आंबा घाटात चाैपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गाऐवजी काही पर्यटक अणुस्कुरा मार्गाचा अवलंब करीत आहेत.गणपतीपुळे येथे गेल्या दाेन दिवसात पर्यटकांची माेठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे. शनिवारी आणि रविवारी तब्बल ४० हजार भाविकांनी स्वयंभू गणेशाचे दर्शन घेतल्याचे देवस्थानकडून सांगण्यात येत आहे. पर्यटकांमुळे येथील समुद्र किनाराही फुलून गेला आहे. हे पर्यटक गणपतीपुळे, मालगुंड, आरे-वारे येथे मुक्कामासाठी थांबत आहेत.
पाेलिसांची नजरदापोली येथे वाळूत गाड्या रुतल्याच्या घटनेनंतर आरे-वारे येथे पर्यटकांनी किनाऱ्यावर गाड्या नेणे बंद केले आहे. या ठिकाणी पाेलिसांनीही नजर ठेवली आहे. गणपतीपुळे येथेही पर्यटकांची गर्दी वाढल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दापोली, गुहागरातही गर्दीदापाेलीतील हर्णै, आंजर्ले, मुरुड, पाळंद, कर्दे या ठिकाणी पर्यटक हजेरी लावत आहेत. तसेच गुहागरातील हेदवी, गुहागर समुद्र किनारा, वेळणेश्वर, असगाेली, वेलदूर-नवानगर, धाेपावे या ठिकाणांना पर्यटकांची पसंती मिळत आहे.