गुहागर : गुहागर समुद्रकिनारी वाळूत वन विभागाने लाखो रुपये खर्चून पर्यटन विकासांतर्गत नक्षत्रवन व नाना-नानी पार्कची उभारणी केली आहे. या दोन्ही प्रकल्पांना कायमस्वरुपी हिरवेगार ठेवण्यासाठी खोदण्यात आलेली विहीर ही पाणी खारट व क्षारयुक्त असल्याने बुजविण्याची वेळ वन विभागावर आली आहे.आमदार भास्कर जाधव यांनी राज्यमंत्री असताना पर्यटनामधून गुहागरचा विकास व्हावा, यासाठी गुहागर समुद्रकिनारी लाखो रुपयांचा निधी विविध कामांवर खर्चकेला. यामधून नक्षत्रवन, नाना-नानी पार्क ची उभारणी करण्यात आली. नक्षत्रवन आणि पार्क मधील शोभिवंत झाडांना आणि बगीच्याला हिरवेगार ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ७ लाख ५८ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, पाण्याअभावी येथील झाडांची अवस्था दयनीय झाली आहे. वन विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्यात समन्वय नसल्यामुळे पावसाळ्यानंतर खासगी टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.काही महिन्यांपूर्वी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने रितसर कंत्राटदाराची नियुक्ती करुन येथील विहिरीची खोदाई केली. मात्र, या विहिरीचे क्षारयुक्त, खारट पाणी झाडांसाठी उपयुक्त नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे वन विभागाने ही विहीर बुजविण्याचा निर्णय घेतल्याचे वनपाल सुधाकर गुरव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील विहीर बुजवली
By admin | Published: June 05, 2016 11:04 PM