मंडणगड शहरापासून वाहत जाणारे पाणी पणदेरी येथे सावित्री खाडीला मिळते. त्यामुळे हे वाहून जाणारे पाणी अडवून ठेवावे, अशी अपेक्षा त्यामागची असावी, असे त्यावेळी या धरणाच्या निर्मितीवरुन कळते. कारण धरणचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले. यावरुन या धरणाला फार महत्त्व नसल्याचे समजते. यात फार विशेष काही नाही. कारण तालुक्यातील अन्य धरणांचे विशेषत: कोकणातील अनेक धरणांचे तसेच आहे. तालुक्यातील असलेल्या अन्य पाच धरणांचेही त्यांच्या निर्मितीपासून असेच अपुरे, अर्धवट काम आहे. त्यांच्या निर्मितीपासून सेच अपुरे, अर्धवट काम आहे. त्यांचा आजवर गावागावातील पाण्याची पातळी टिकवण्यासाठीच उपयोग झाला. या धरणांवर कुठेही सिंचनाचे प्रकल्प अथवा ओलिताखाली शेतीची आकडेवारी वाढलेली नाही. धरण नसतानाही शेतकरी पावसावर अवलंबून असलेली शेती करत होता आणि धरणानंतरही पावसावरील शेतीच करत आला आहे. धरणामुळे तालुक्यात आजवर केव्हा दुबार शेती केल्याचे ऐकायला मिळत नाही. गत पाच वर्षांत गोळवली धरणाच्या पाण्यावर हिवाळ्यात कलिंगड आणि भाजीपाला लागवडीचा पर्याय काही शेतकरी करत आहेत.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा याठिकाणी जशी धरणांना सुबत्ता आणली, तशी स्थिती कोकणात कुठेच पाहावयास मिळत नाही. तालुक्याचा विचार करता इथल्या लोकांना पाणी पिण्यास मिळणे ही मोठी अडचण होती आणि ती दूर करण्यासाठी तत्कालीन राजकारण्यांनी धरण निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि तेव्हापासून ते आजपर्चंत धरण निर्मितीमधील अर्थार्जन हा मोठा भाग असल्याने आगापीछा न पाहता म्हणजे त्याचा स्थानिक ग्रामस्थांना फायदा, तोटा न पाहता तालुक्यात सर्व धरणे उभारण्यात आली आहेत. राज्यातील अन्य भागातील विकसित झालेले सहकार क्षेत्र, सिंचन क्षेत्र पाहिल्यानंतर कोकणात कधी सहकार आणि पाणी मुरलेच नाही, असे दिसते. इथल्या सहकारी पतसंस्था आणि धरणांच्या पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग किंवा त्यांची किंमत कळलेली नाही किंवा कळू दिलेली नाही. मात्र, कोकणात सहकार सिंचनातील गाळाचे राजकारण अधिकारी वर्गात चांगलेच मुरले आहे. त्यामुळेच उपयोगशून्य असलेल्या धरणांची एकामागून एक निर्मिती राहिली आहे आणि त्याची किंमत स्थानिकांना आता अनेक वर्षांनंतर मोजावी लागत आहे. तिवरे धरण असो वा अन्य स्थानिकांना त्याचा फार उपयोग झाला नाही. मात्र, त्यावेळी नुकसानच वेळेला जीवितहानी सहन करावी लागली आहे. यावरुन कोकणातील मंडणगड तालुक्यातील धरणे नक्की कुणासाठी आणि कशासाठी, याचा खरा फायदा का झाला आणि नुकसान कोणाचे होत आहे, हे पणदेरी धरणाच्या गळतीवरुन दिसून येत आहे. ही स्थिती आगामी काळात तरी बदलेल अशी अपेक्षा. सिंचन नाही तर जीव वाचवावा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
- प्रशांत सुर्वे, मंडणगड