रत्नागिरी : गेल्या १६ वर्षात आरोग्याच्या दृष्टीने, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींबाबत रत्नागिरी तालुक्यात काय विकास झाला आहे, असा प्रश्न करत भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर कडाडून टीका केली. गेल्या काही वर्षात गुन्हेगारीला राजाश्रय मिळत असल्याची गंभीर टीकाही त्यांनी केली. रत्नागिरीत आता शिवसेनेची सामंतसेना झाली असल्याची टीकाही त्यांनी केली.
लसीकरणाच्या मुद्द्यावरून माने यांनी मंत्री सामंत यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी बाळ माने यांच्यावर कडाडून टीका केली. माने चारवेळा निवडणुकीत पराभूत झाले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यापाठी जनाधार नाही, असे विधान मंत्री सामंत यांनी केले होते. त्याला बाळ माने यांनी शुक्रवारी पुन्हा उत्तर दिले.
आपण चारवेळा पराभूत झालो आहोत. मात्र, सामंत यांनी आपण कसे निवडून आलो आहोत, याचा विचार करावा. ते कसे निवडून आले, याची माहिती आमदार राजन साळवी, प्रमोद शेरे अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकतील. आपण चार वेळा निवडून आलो, आपल्यामागे जनाधार नाही, असा आरोप करणारे सामंत आणि विनायक राऊत हे आपल्याला घेऊनच २०१९च्या निवडणुकीत फिरत होते, असा टोला त्यांनी हाणला.
चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यात आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी काय काम केले आहे, असा प्रश्न त्यांनी केला. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर कोरोना येण्याआधीपासूनच असंख्य पदे रिक्त आहेत. ऑक्सिजन प्लांट करण्यासाठी वर्ष गेले. असंख्य सुविधा नाहीत. लसीकरणात कोणतेही नियोजन नाही, अशी टीका माने यांनी केली.
आपण विरोधी पक्षात आहोत. दोष दाखवून देणे हे आमचे काम आहे. मात्र, सामंत यांचे बगलबच्चे असे म्हणतात, की आम्ही सहन करणार नाही. हे कधी शिवसैनिक झाले. शिवसैनिकांशी आपली अजूनही चांगली मैत्री आहे. पण, आता रत्नागिरीत शिवसेना राहिलेलीच नाही. ती सामंत सेना झाली आहे, असा टोला त्यांनी हाणला.
आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत. आमच्या दोन पिढ्या एकाच ठिकाणी काम करत आहेत. आमच्या वडिलांनी आम्हाला राजकारण नाही तर समाजकारण शिकवले आहे, असेही ते म्हणाले. आता आपल्याला राजकारण करायचे नाही. आपण कधीही वैयक्तिक टीका करत नाही. आपल्यावर वैयक्तिक टीका झाली असली तरी आपण त्या पातळीवर उतरलेलो नाही. २०१४ ते २०१९ या काळात सामंत यांना मंत्रीपद का मिळाले नाही, २०१९ला मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना रत्नागिरीचे पालकमंत्री न करता सिंधुदुर्गचे का करण्यात आले, असे प्रश्न आपण विचारलेले नाहीत, असेही ते म्हणाले.
सध्या रत्नागिरीत राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. बलात्कारासारख्या खटल्यातील आरोपींना आता राजाश्रय मिळत आहे, अशी गंभीर टीकाही त्यांनी यावेळी केली.
मी बाजीगर, सिंघम होणार
वाढलेली गुन्हेगारी पाहता रत्नागिरीत कोणी सिंघम किंवा बाजीगर येणे गरजेचे आहे. भाजपकडून मी तो सिंघम होणार आहे. बाजीगरही मीच आहे, असे त्यांनी सांगितले आणि जिथे जिथे अन्याय होईल, तिथे आपण सर्वात प्रथम पोहोचणार असल्याचेही ते म्हणाले.