मालवण : दोन दिवसांपूर्वी मत्स्य विभागाने गोव्यातील एक एलईडी नौका पकडली आहे. तरीसुद्धा मालवण आणि वेंगुर्ले समोरील समुद्रात एलईडी दिव्यांच्या साह्याने होणार , बेकायदेशीर मासेमारीचा लखलखाट कायम असल्याने पारंपरिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाला निवेदन सादर करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दांडी येथून पारंपरिक गिलनेट प्रकारातील न्हैय मासेमारीस गेलेले महेंद्र पराडकर यांनी मत्स्य विभागास निवेदन सादर करून एलईडी मासेमारी बंद करण्याची मागणी केली आहे. पराडकर निवती दीपस्तंभाजवळील ३० वाव खोल समुद्रात मासेमारीस गेले होते.
सायंकाळी ७.३० वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत एलईडी दिव्यांचा लखलखाट कायम होता. किमान सात ते आठ एलईडी नौका मालवण ते वेंगुर्लेपर्यंतच्या समुद्रात होते ही बाब पराडकर यांनी मत्स्य विभागाच्या निदर्शनास आणून दिली. शुक्रवारी दुपारी २.३० वाजता आम्ही मासेमारीस गेलो आणि शनिवारी हाटे ५.३० च्या सुमारास किना?्यावर परतलो.
एवढ्या खोल समुद्रात मासेमारीस जाऊनसुद्धा आम्हाला केवळ दोन बुगड्या आणि सहा बांगडे मिळाले. ज्यात आमचा इंधन खर्चसुद्धा भागणार नाही अशी खंत पराडकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान शुक्रवारी मत्स्य विभागाची गस्ती नौका काय करीत होती? गस्तीला गेली होती का? असा सवाल मत्स्य अधिका?्यांना केला असता काल गस्ती देवगडला गस्त घालत होती असे सांगितले गेल्याचे पराडकर म्हणाले.