चिपळूण : तालुक्यात १,५४६ वर बाधित रुग्णांची संख्या पोहोचली आहे. यामध्ये शहर व परिसरातील रुग्ण संख्या अधिक असल्याने नगर परिषदतर्फे उभारण्यात येणाऱ्या कोरोना केअर सेंटर तातडीने उभारण्याची मागणी होत आहे.
गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यात शहरातील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे शहरात काेराेना केअर सेंटर कधी उभे राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रुग्णांचा आकडा कधी कमी होत आहे तर कधी तो विक्रम करत आहे. काही दिवसापूर्वी एकाच दिवशी २०० रुग्ण सापडले होते. हा चिपळूणातील सर्वात मोठा आकडा होता. असे असताना मंगळवारी एकाच दिवशी तब्बल २०७ नवे रुग्ण सापडले. तर बुधवारी आणखी १०० नव्या रुग्णांची यात भर पडली. दोन दिवसात १४ जणांचा कोरोनाने बळी घेतला. वाढत्या रुग्णांमुळे तालुक्यातील बाधितांची संख्या १,५४६ वर पोहोचली आहे. त्यातील ११७ जणांवर कामथे, ३४ जणांवर वहाळ कोविड सेंटर, ५९ जणांवर पेढांबे कोविड सेंटर व अन्य रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १,०८५ जणांवर घरात उपचार सुरू आहेत. १६ जणांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले आहे. आतापर्यंत तालुक्यातील ५,६०१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ३,८९० जण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत १७१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
अशा परिस्थितीत शहरातील अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेडअभावी मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नगर परिषदमार्फत उभारण्यात येणारे कोरोना केअर सेंटर तातडीने उभारण्याची मागणी होत आहे. याविषयी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी सांगितले की, नुकतेच पुण्यातील एका वैद्यकीय पथकामार्फत नियोजित जागेची पाहणी केली. त्यानुसार सेंटरच्या डिझाइनचे काम सुरू असून लवकरच हे सेंटर सुरू केले जाणार आहे.
चौकट
रुग्णवाहिकेसाठी निविदा
येथील नगर परिषदेने दवाखाना विभागासाठी कोविड १९ च्या अनुषंगाने रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्यासाठी शुक्रवारी निविदा जाहीर केली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी आणखी एक रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.