संदीप बांद्रे
चिपळूण (जि. रत्नागिरी): तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनाग्रस्तांच्या भावनांचा बांध आजही फुटलेलाच आहे. वर्षभरात ना पुनर्वसनाला वेग आला, ना पाणी योजनेचा प्रश्न सुटला. पिण्याच्या पाण्यासाठीही वेळोवेळी पीडितांना अधिकाऱ्यांसमोर हात जोडावे लागत आहेत. आता तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे तिवरे धरणग्रस्तांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळणाऱ्या ५ लाख रूपयांच्या मदतीचीही पीडितांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
तिवरे - भेंदवाडी येथील धरण फुटीची घटना २ जुलै २०१९ रोजी रात्री ९.३० वाजता घडली. त्यात तब्बल २२ जणांचा बळी गेला. दीड वर्षांची चिमुकली पूर्वा रणजित चव्हाण ही शेवटपर्यंत हाती लागली नाही. उर्वरित २१ जणांचे मृतदेह सापडले होते. दुर्घटनेत १७ घरे व १३ गोठे वाहून गेले. त्यामुळे ४६ जनावरांचाही बळी गेला.
धरणफुटीच्या घटनेनंतर संबंधित दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना तत्काळ मदत मिळावी यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मृत व्यक्तीसाठी प्रत्येकी ४ लाख रूपयांचा निधी, तर केंद्र शासनाकडून २ लाख रूपये असे एकूण ६ लाख रूपये देण्यात आले. त्याआधी पाटबंधारे विभागाने तत्काळ स्वरूपाची १० हजार रूपयांची मदत केली होती.केवळ निविदा निघालीमुंबईतील सिध्दीविनायक ट्रस्टने ५ कोटींचा निधी उपलब्ध केल्यानंतरही या कामाला वेग आलेला नाही. अलोरेतील पुनर्वसनासाठी नुकतीच निविदा काढली आहे.