रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. रुग्णांसाठी अधिकची बेड
व्यवस्था हवी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ५००० रुग्ण संख्या होण्याची भीती
व्यक्त केली. वाढत्या रुग्णसंख्येनंतरही रत्नागिरी नगर परिषदेच्या काेविड सेंटर सुरू करण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्न भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला आहे.
ते म्हणाले की, एवढी रुग्ण संख्या लक्षात घेता रत्नागिरीमध्ये अधिक
हॉस्पिटल्स ऑक्सिजन बेडची आवश्यकता आहे. रत्नागिरी नगरपरिषद कोविड
केअर सेंटर सुरू करणार अशी घोषणा झाली. मात्र, अद्यापपर्यंत ते सुरू झाल्याचे
ऐकिवात नाही. रत्नागिरी नगरपरिषदेने शहरवासीयांची काळजी घेण्याच्या
दृष्टीने तत्काळ केअर सेंटर सुरू करावे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी इतकी
दिरंगाई अपेक्षित नाही. रत्नागिरी नगरपरिषद ही जिल्ह्यातील मोठी नगरपरिषद
असून, अद्याप कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात मागे आहे, ही बाब खेदजनक आहे, असे पटवर्धन यांनी म्हटले आहे.
नगराध्यक्ष, सर्व नगरसेवकांनी यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करत कोविड
केअर सेंटर सुरू करावे. कोविड निधी यासाठी उपलब्ध आहे, अशी माहिती मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता आता अधिक वेळ न घालवता कोविड सेंटर तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही नगरपरिषदेने करावी, अशी
मागणी ॲड. दीपक पटवर्धन यांनी नगराध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी
यांना पत्र लिहून केली आहे.