रत्नागिरी : जिल्ह्यातील बौध्दवाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नळकनेक्शनचे ५०० प्रस्ताव सादर करण्यात आले असून, ते अपूर्ण आहेत. हे प्रस्ताव अपूर्ण असल्याने त्यासाठी खर्च करण्यात येणारे ४३ लाख रुपये निधी पडून राहणार आहे.पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे शासनाकडून असे धोरण राबवण्यात येत असताना, दुसरीकडे त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायत स्तरावरून एखादा प्रस्ताव सादर करताना त्याची पूर्तता करुनच तो पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर पाठवणे आवश्यक आहे. मात्र, बौध्दवाड्यांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलितवस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील बौध्दवाड्यांसाठी नळ कनेक्शन जोडणीसाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. या बौध्दवाड्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या कालावधीत पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून नळ कनेक्शन देण्यासाठी सुमारे ४३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक तालुक्यात आलेले सुमारे ५०० प्रस्ताव अपूर्ण आहेत. नळजोडणीसाठी देण्यात आलेल्या अपूर्ण प्रस्तांवामध्ये कागदपत्रांची पूर्तता नाही. अपूर्ण कागदपत्र असताना ते प्रस्ताव कसे स्वीकारण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अपूर्ण प्रस्तावांमुळे नळकनेक्शन जोडणीसाठीचा निधी पडून राहणार आहे. त्यास नक्की जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)
बौध्दवाड्यांची तहान कधी भागणार ?
By admin | Published: February 27, 2015 10:51 PM