मारुतीचं शेपूट वाढत जातं, तशी महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यापूर्वी महागाई झाल्यानंतर वातावरण पेटत होते. मात्र, आता गॅस सिलिंडर कुठेही कोणीही डोक्यावर घेऊन रस्त्यावर आलेले दिसत नाही. त्यामुळे आता गरिबांना कोणीही वाली उरलेला नाही. कारण दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असली तरी ग्रामीण, शहरात, राज्यात आणि देशात वेगळेच प्रश्न उपस्थित करुन आंदोलने पेटविली जात असली तरी महागाईविरोधात कोणतेही आंदोलन पेटताना दिसत नाही. जे सर्वसामान्य लोक यात भरडले जात आहेत, तेच मुळात जागे नसल्याने आवाज उठवणार कोण, हाच मोठा प्रश्न आहे. गरीब मेला तरी चालेल, पण किमती वाढल्याच पाहिजेत, अशा भूमिकेत राजकीय पक्षांची नेतेमंडळी मिरवताना दिसत आहेत.
दररोज वेगवेगळ्या प्रश्नांवर राजकीय मंडळी मुलाखती देताना दिसतात. पण महागाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर कोणीही ब्र सुध्दा काढताना दिसत नाही. यापेक्षा गोरगरिबांचे दुर्दैव नाही. महागाईने गरीब भरडला जात आहे, याचा विचार करण्यासाठी कोणालाही वेळ मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे महागाई कमी होईल, गरिबांना दोन घास जास्त घेता येतील, तसेच काही तरी पैसे बाजूला ठेवता येतील, असेही आता वाटत नाही. त्यामुळे गरीब आणखीच गरीब होत चालला आहे, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
जणू काही लोकांना महागाईची सवयच लागलेली आहे, असे म्हटल्यावर चुकीचे ठरणार नाही. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडर यांचे दर पेटले आहेत. इंधन महाग झाल्याने अन्नधान्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खासगी नोकर, कर्मचाऱ्यांची नोकरी राहीलच, याचा नेम नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. उत्पादनच नसेल तर नोकरवर्ग ठेवून काय करणार, असा विचार प्रत्येक व्यापारी, उद्याेगपती करीत असल्याने त्यात काय चूक आहे. मात्र, अनेक वर्षे प्रचंड नफा कमवून देणाऱ्या नोकर, कर्मचाऱ्यांचा विचार होणे आवश्यक आहे. तसा विचार कोणीही करीत नसल्याने आज अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली असतानाच त्यांना आणखी मारक ठरली आहे ती महागाई.
राजकीय पक्षांनी गरीब जनतेचा विचार करणे अपेक्षित आहे. सत्तेवर आल्यानंतर त्या गरीबांना कोण विचारतो, अशी स्थिती आहे. केवळ गरीबांचा, सर्वसामान्यांचा मतांसाठी वापर करुन नंतर त्यांना पाठीशी नाचवायचं, असाच प्रकार सुरु आहे. त्यामुळे जनतेला कोणीही जुमानत नाहीत. त्यांच्या मूळ समस्या, प्रश्नांकडे कोणालाही लक्ष देण्यासाठी वेळ नाही. गरीब, सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. कोट्यवधींच्या घोषणा करण्यात येतात. मात्र, त्याचा लाभ गरिबांपर्यंत मिळतो काय, याचा विचार कोण करणार, याची विचारणा कोण करणार. राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यामध्ये माहीर झाले आहेत. केवळ चुका पाहून दररोज स्वत:च्या प्रसिध्दीच्या मागे लागण्यापेक्षा महागाईवर बोलावे. मंदिर-मशीद, जात-धर्मापलिकडे काही आहे की नाही. लोक बेरोजगारी, गरीबीमुळे हैराण झाले आहेत. अन्नधान्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत तसेच त्यांच्या रोजगाराबाबत बोला, ते न बोलता केवळ राजकारण खेळत बसायचे, असा प्रकार सुरु आहे. हे कोठेही थांबायला पाहिजेत. याचा प्रत्येक राजकीय पक्षाने विचार करावा, अन्य जनता कधीही माफ करणार नाही.