चिपळूण : मराठी चित्रपटांपेक्षा आपण हिंदी चित्रपटांना झुकते माप देतो. पण जेव्हा आपत्ती येतात, तेव्हा ते मदतीला येतात का? कुठे आहेत सलमान खान, शाहरुख खान? असा प्रश्न अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला. आपण मराठी चित्रपट सृष्टीला ताकद दिली, तरच मराठी कलाकार तुमच्या मदतीला येऊ शकतील, असेही त्या म्हणाल्या.
महापुरात चिपळूणचे अतोनात नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी त्या सोमवारी चिपळूणमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे मत मांडले. मराठी चित्रपटांना आपण पाठबळ देत नाही. त्यांना थिएटर्सही मिळत नाहीत. त्यांनी मदत करण्यासाठी बाहेर पडावे, अशी अपेक्षा असेल तर त्यासाठी त्यांना लोकांनी पाठबळही द्यायला हवे. आपण हिंदी चित्रपटांना जेवढा मानसन्मान देतो, तेवढा आपण मराठीला देतो का? असा प्रश्न त्यांनी केला.
आपण वाशिष्ठी नदीकाठच्या भागात पाहणी केली. तेथे आतापर्यंत कोणीही पोहोचलेले नाहीत. तेथील परिस्थितीचा आपल्याला अंदाज आला आहे. नुकसानाचे पंचनामे घेऊन आपण लवकरच तेथे मदत देऊ, असे त्या म्हणाल्या. माझं माहेर चिपळूण तालुक्यातील पोफळी शिरगाव येथे आहे. त्यामुळे चिपळूणला माझं घर म्हणून आवश्यक असलेली सर्व मदत मी करेन, असेही त्यांनी सांगितले.