ज्यांना मते दिलीत ते कुठे गेले आता?, मंत्री उदय सामंतांचा सवाल; रत्नागिरीत वक्फ मंडळ कार्यालयाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 12:06 PM2024-10-08T12:06:58+5:302024-10-08T12:09:22+5:30
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि देशाचे संविधान बदलले जाणार आहे याबद्दल ज्यांनी तुमच्या मनात विष पेरले आणि ...
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि देशाचे संविधान बदलले जाणार आहे याबद्दल ज्यांनी तुमच्या मनात विष पेरले आणि त्यामुळेच तुम्ही ज्यांना मते दिलीत ते उद्धवसेना आणि काँग्रेसचे लोक आज कोठे आहेत, असा प्रश्न उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला. वक्फ मंडळाच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक न्याय भवन येथे मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले.
उदय सामंत म्हणाले, तुम्हाला जसा मशिदीचा अभिमान आहे, तसा मला मंदिराचा अभिमान आहे. प्रत्येकाला तो असतो. पण, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपण कधीही जातपात, धर्म पाहून काम करत नाही. मच्छीमार असोत किंवा अन्य कोणी, सर्वांच्या समस्या सोडविण्यावर माझा भर असतो. यावेळी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. ज्यांना तुम्ही मते दिलीत, त्यांचा एकही पदाधिकारी, कार्यकर्ता वक्फ मंडळ कार्यालयाचे उद्घाटन होताना फिरकलासुद्धा नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
तुमच्या मनात मुद्दाम विष पेरण्यात आले
उदय सामंत म्हणाले, तुमच्या मनात मुद्दाम विष पेरण्यात आले आहे. आता मोदी पंतप्रधान होऊन बरेच दिवस झाले. एकतरी मुसलमान बांधव देशाबाहेर गेला का? तुमच्यामध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, तसे काही मनात ठेवू नका. आपण तुमच्या समस्यांसाठी नेहमी उभे असू, असेही ते म्हणाले.
मंडळाचे काम सहा महिन्यांपूर्वीच सुरू
आज मंडळाचे उद्घाटन होत असल्याचे जे लोक सांगत आहेत, त्यांचा अभ्यास थोडा कमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिलेल्या पाठबळामुळे मंडळ सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाले आहे. या कार्यालयातील अंतर्गत सजावटीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन आज करण्यात आले, असे ते म्हणाले.