मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : दरवर्षी नववीच्या वर्गातील संख्या व दहावीचे अर्ज भरणाऱ्या विद्यार्थीसंख्येत कमालीची तफावत आढळते. जिल्ह्यात सातशे ते साडेसातशेच्या घरात संख्या आहे. यामध्ये काही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीअभावी शाळा सोडतात, तर काही विद्यार्थी पालकांची बदली होत असल्याने दुसऱ्या जिल्ह्यात, शहरात स्थलांतर करतात ही सुद्धा गळतीची कारणे आहेत.
शासन निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंत मुलांना पास करण्यात येते. नववीमध्ये मुले अप्रगत आढळली तर त्यांच्यासाठी शिक्षकांनी जादा अभ्यासवर्ग आयोजित करून मुलांची तयारी करून घेण्याच्या सूचना आहेत. दोन वर्षांपूर्वी नववीच्या मुलांना सरसकट पास न करता, त्यांच्यासाठी विशेष परिश्रम शिक्षक घेत असत. अप्रगत विद्यार्थ्यांनी शाळा सोडणे हेही कारण आहे. मात्र, २०२० व २०२१ मध्ये कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने नववीपर्यंत सरसकट विद्यार्थ्यांना पास करण्यात येत आहे.
जिल्ह्यात गळतीचे प्रमाण मर्यादितच
ग्रामीण भागात माध्यमिक शाळा असल्याने पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणे सोयीस्कर ठरत आहे. मात्र, गोरगरीब कुटुंबातील मुलांना नाइलाजास्तव शिक्षण थांबवून रोजगारासाठी बाहेर पडावे लागत आहे.
पालकांच्या नोकरीतील बदलीमुळे एका गावातून दुसऱ्या गावात जावे लागते तेव्हा कुटुंबासह स्थलांतर करावे लागत असल्याने मुलांची शाळा आपसूकच बदलावी लागत आहे.
काही शाळा शंभर टक्के निकालाची परंपरा राखण्यासाठी अप्रगत मुलांना १७ नंबरचा फाॅर्म भरायला लावून बहिस्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश देतात. त्यामुळेही गळतीचे प्रमाण वाढत आहे.
आर्थिक चणचण, स्थलांतर
n जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण शून्य असल्याने शिक्षण थांबवून विवाह केले जात नाहीत.
n आर्थिक परिस्थितीमुळे काही मुलांना मध्येच शिक्षण थांबवावे लागत आहे.
n नोकरदार मंडळींना बदलीमुळे स्थलांतर करावे लागत असल्याने शाळा बदलावी लागते.
n अभ्यासात अप्रगत असणारी मुले दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा धसका घेऊन शाळा सोडतात.
नववीतून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गळती होत असली तरी आपल्या जिल्ह्यात हे प्रमाण अल्प आहे. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शिक्षक कठोर परिश्रम घेत असतात. गेल्या दोन वर्षांत तर सरसकट पास करण्यात येत आहे. आर्थिक परिस्थिती व नोकरीतील बदली ही गळतीची दोन कारणे प्रमुख आहेत. काही विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत न जाता १७ नंबरचा फाॅर्म भरून बहिस्थ विद्यार्थी म्हणून परीक्षा देतात.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.