लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रूग्णालयासह अन्य काही शासकीय दवाखाने तसेच खासगी दवाखानेही कोरोना हाॅस्पिटल म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे आता कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रूग्णांना वेळेवर उपचार मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे या रूग्णांनी जायचे कुठे, ही समस्या निर्माण झाली आहे.
एप्रिल महिन्यात कोरोना रूग्णांचे प्रमाण लक्षणीय वाढू लागले. त्यामुळे येथील महिला रूग्णालयाबरोबरच आता पुन्हा जिल्हा शासकीय रूग्णालयही कोरोना रूग्णालय म्हणून सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने धोका लक्षात घेऊन नियमित शस्त्रक्रियाही थांबविण्यात आल्या आहेत. कोरोना रूग्ण वाढल्याने जिल्हा रूग्णालयावर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. मात्र, यामुळे अन्य अत्यवस्थ रूग्णांना जिल्हा रूग्णालयात आरोग्य सेवा मिळताना अडचणी येऊ लागल्या आहेत. काही रूग्णांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात जाण्याची वेळ येत आहे.
सध्या शहरातील काही मोठ्या खासगी रूग्णालयांमध्येही कोरोना रूग्णांवर उपचार सुरू झाले आहेत. त्यामुळे नाॅन कोरोना गंभीर रूग्णांनी उपचारासाठी कुठल्या रूग्णालयात जावे, ही विवंचना वाढली आहे. शहरातील झाडगाव, कोकणनगर या नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू आहे. तसेच रत्नागिरी नगर परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र कोरोना रूग्णालय म्हणून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शासकीय रूग्णालयांमध्ये अन्य गंभीर रूग्णांना उपचार मिळणे अवघड झाल्याने अनेक रूग्णांना जिल्ह्याबाहेर उपचारासाठी जावे लागत आहे.
रोज ८ ते १० रूग्णांना जावे लागते परत
जिल्हा शासकीय रूग्णालय सध्या कोरोना रूग्णालय झाले आहे. तसेच काही खासगी रूग्णालयेही कोरोना रूग्णालये झाली आहेत. सध्या कोरोनाचे रूग्ण वाढल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात अन्य रूग्णांसाठी खाटा अपुऱ्या पडत आहेत. त्याचबरोबर काही खासगी रूग्णालयांमध्येही ही समस्या येत असल्याने दररोज ८ ते १० रूग्णांना परत जावे लागते. सध्या जिल्हा शासकीय रूग्णालय कोरोना रूग्णालय झाल्याने नाॅन कोविड रूग्णांवर उपचार करताना मर्यादा येत आहेत. सध्या नियमित शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत.
- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी