सचिन मोहितेदेवरुख : भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या खोल विहिरीत पडल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील मेढे तर्फे फुणगुस येथे आज, बुधवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास घडली. वनविभागाने घटनास्थळी दाखल होऊन पिंजऱ्याच्या साहाय्याने या नर जातीच्या बिबट्यास सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले.मेढे तर्फ फुणगुस येथील सुभाष दत्ताराम देसाई यांच्या राहत्या घराच्या समोर विहिरीमध्ये बिबट्या पडल्या असल्याची माहिती पोलिस पाटील दीपक सावंत यांनी वनपाल संगमेश्वर (देवरुख) यांना दिली. त्यानंतर वनविभागाने रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. सुमारे २५ फुट खोल विहीरीमध्ये दोन ते अडीच फुट पाणी होते. बिबट्या दगडाचा आधार घेऊन बसला होता. वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीमध्ये पिंजरा सोडून बिबट्याला पिजऱ्यामध्ये जेरबंद केले. यानंतर देवरुखचे पशुवैद्यकीय अधिकारी आनंदराव कदम यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. हा बिबट्या अंदाचे ३ वर्षाचा असुन तो नर जातीचा आहे. तपासणी वेळी सुस्थितीत असल्याने जेरबंद बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वनपाल तौफीक मुल्ला यांनी बिबट्या भक्षाचा पाठलाग करत असताना विहीरीत पडला असल्याची शक्यता व्यक्त केली. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. रेस्कु ऑपरेशनवेळी वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडूकर, अरुण माळी, व रेस्कु टीम देवरुखचे दिलीप गुरव , निलेश मोहिरे, मिथील वाचासिद्ध,पोलिस पाटिल दिपक सावंत, सरपंच जयंत देसाई व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला, वनविभागाने सुखरूप बाहेर काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 5:06 PM