रत्नागिरी : शहरातील एसआरएस ग्रुप या सर्पमित्रांच्या टीमने काल (मंगळवारी) सकाळी पार्शियल अलबिनी जातीच्या घोणसाला नजीकच्या शांतीनगर भागात पकडून त्याला जीवदान दिले. पांढऱ्या रंगाचा हा घोणस पहिल्यांदाच रत्नागिरीत आढळला आहे.रत्नागिरीतील एसआरएस हा ग्रुप गेली काही वर्षे साप व इतर वन्य प्राण्यांना जीवदान देत आहे. आजपर्यंत या ग्रुपने शेकडो सापांना जीवदान दिले आहे. १८ रोजी सकाळी सर्पमित्र प्रवीण कदम आणि सुशील कदम यांनी दुर्मीळ अशा पार्शियल अलबिनी घोणसाला जीवदान दिले. काल (मंगळवारी) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा पांढऱ्या रंगाचा घोणस शहरानजीकच्या शांतीनगर या भागात नागरिकांना दिसला. नागरिकांनी लगेच फोनवरून एसआरएस ग्रुपच्या सदस्यांशी संपर्क साधला. सुशील कदम आणि प्रवीण कदम यांनी शांतीनगरला जाऊन सहजगत्या सापाला पकडले व त्याला दुसऱ्या दिवशी जंगलात सोडून दिले. हा घोणस जातीचा साप असून, इतर घोणसांपेक्षा अतिशय वेगळा आहे. रत्नागिरीत हा पार्शियल अलबिनी जातीचा घोणस पहिल्यांदाच आढळला असल्याचे कदम यांनी सांगितले. सापांची वस्तीस्थाने नष्ट झाल्याने असे अनेक साप मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. त्यामुळे असे साप आढळल्यास नागरिकांनी सर्पमित्र प्रवीण कदम ७२७६९९९९०८ किंवा सुशील कदम यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
‘एसआरएस’ ग्रुपने दिले पांढऱ्या घोणसाला जीवदान
By admin | Published: November 19, 2014 9:25 PM