अरूण आडिवरेकर -- रत्नागिरी जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद, नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना - भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षातील युती संपुष्टात आल्याने चुरस आणि रंगत वाढली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही पक्षांमध्ये ‘दिवाळी’ आहे. पण, या आघाडीचा फायदा कोणाला होणार काँग्रेसला की राष्ट्रवादीला हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगर परिषदांबरोबरच दापोली नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. या निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चार प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या २५ वर्षात टिकून राहिलेली युती संपुष्टात आल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरल्याने दोन्ही पक्षांनी एकमेकांसमोर जोरदार दंड थोपटले आहेत. इतकी वर्ष एकमेकांच्या गळ्यात गळे घालून एकत्रितपणे प्रचार यंत्रणा राबविणारी दोन्ही पक्षातील नेतेमंडळी स्वतंत्रपणे प्रचारात गुंतली आहेत. एकमेकांचे गोडवे गाणारे ही मंडळी आता एकमेकांची ‘उणीदुणी’ काढताना दिसणार आहेत. या दोन्ही पक्षातील कलहाचा फायदा उठविण्यासाठी इतर पक्षांनी जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने आघाडी करूनच निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. युतीत धुमसत असलेल्या आगीवर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न इतर पक्षांनी केला असला, तरी ही पोळी कितपत भाजणार आहे, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये पाचही ठिकाणी सेना - भाजपने युतीचे धागे तोडून स्वतंत्र इउमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला असला, तरी चिपळूण, खेड या ठिकाणी आघाडी करण्यात आलेली नाही. उर्वरीत ठिकाणी आघाडी म्हणूनच निवडणुकांना सामोरे जात आहेत. २०११मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये आघाडी करूनही दोन्ही पक्षांच्या पदरात फारसे यश पडलेले नाही. राजापूर आणि चिपळूण वगळता आघाडीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. राजापूरमध्ये काँग्रेसचे ७ तर राष्ट्रवादीचे २ सदस्य निवडून आले होते. त्यामुळे आघाडीने आपला वरचष्मा राखला होता.रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीला ५ तर काँग्रेसला १ जागाच जिंकता आली होती. याठिकाणी युती म्हणून जिंकलेल्या सेना - भाजपची सत्ता होती. कालांतराने काँग्रेसच्या एका सदस्याने दुसऱ्या पक्षाचा आधार घेतल्याने आघाडीची संख्या घटली होती. चिपळूणमध्ये आघाडी म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादीचे १२ तर काँग्रेसचे ३ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे सेना - भाजपला सत्तेपासून दूर ठेवत आघाडीने सत्ता काबीज केली होती. मात्र, आता दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने त्यांना कितपत यश मिळते हे निकालानंतरच स्पष्ट होईल. खेडमध्ये राष्ट्रवादीला १ तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. याठिकाणी मनसेने ९ जागा जिंकून सत्ता काबीज केली होती. त्यामुळे येथेही दोन्ही पक्ष आपला प्रभाव टाकण्यात कमी पडले आहेत.दापोली नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ६ तर काँग्रेसने १ जागा जिंकून विरोधी पक्षांना धोबीपछाड दिले होते. पण, नगराध्यक्ष विराजमान होण्याच्या शर्यतीत राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी सेनेची पाठराखण केल्याने संख्याबळ जास्त असूनही सेनेचा नगराध्यक्ष विराजमान झाला. त्यामुळे येथेही आघाडीच्या पदरी निराशाच आली आहे.आतापर्यंत मिळालेल्या या फटक्यांमधून शहाणे होत यावेळी दोन्ही काँग्रेसनी आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता या आघाडीचे फलित काय होणार, हे २८ तारखेला होणाऱ्या मतमोजणीप्रसंगीच स्पष्ट होणार आहे.काँग्रेसच्या पदरी निराशाखेडमध्ये गतवेळी काँग्रेस - राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. राष्ट्रवादीला केवळ १ तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. यावेळच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीने मनसेशी जवळीक केल्याने काँग्रेस एकाकी पडली आहे.राष्ट्रवादीचा वरचष्मागतवेळी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहिल्याचे दिसून येत आहे. पाच ठिकाणी राष्ट्रवादीने २६ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसच्या पदरात १२ जागा आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्राबल्य अधिक असल्याचे दिसून आले आहे.दापोलीत फुटीर पुन्हा रिंगणातगतवेळी झालेल्या निवडणुकीत आघाडीची सत्ता स्थापन करण्याची संधी काँग्रेस - राष्ट्रवादीकडे होती. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी सेनेशी जवळीक साधल्याने ही संधी हुकली. मात्र, याच फुटीर उमेदवारांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराजीचा सूर आहे.कोण ठरणार सरस?सध्या होत असलेल्या पाच ठिकाणच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ८२ उमेदवार उभे केले आहेत तर काँग्रेसने ५६ उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. राजापूर आणि चिपळूण वगळता काँग्रेसची फार ताकद नसल्याचे दिसत आहे. रत्नागिरीत राष्ट्रवादीचे प्राबल्य कमी झाले असून, दापोलीतही राष्ट्रवादीची ताकद कमी झाल्याने किती यश मिळणार? दोन्ही पक्षांनी आघाडी केली असली, तरी कोण सरस ठरणार? याची उत्सुकता अधिक आहे.
कुणाची दिवाळी, कुणाचं दिवाळं?
By admin | Published: November 05, 2016 10:56 PM