शिवाजी गोरे
दापोली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्यानंतर दापाेलीतील सर्वच समीकरणे बदलली आहेत. त्यातच अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने पक्षांची डाेकेदुखी वाढली आहे. त्यांची मनधरणी करण्याचे काम राजकीय पक्षांकडून सुरू असून, अर्ज माघारीच्या दिवशी साेमवारी (१३ डिसेंबर) काेण माघारी घेताे, हेच पाहायचे आहे.
निवडणुकीच्या रिंगणात आपल्या मार्गातील अडचण दूर करण्यासाठी राजकीय पक्षांकडून अपक्षांचा अडसर दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी केली जात आहे. परंतु, त्यातूनही अनेक अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे किती अपक्ष शेवटपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात राहतात याचे चित्र साेमवारी स्पष्ट हाेणार आहे.
दापोली नगरपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय खिचडी झाली असून, राजकीय पक्षांच्या विरोधात अपक्ष एकवटले आहेत. या अपक्षांमुळे राजकीय पक्षांचे अस्तित्व पणाला लागले आहे. त्यामुळे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात राहू नये यासाठीच सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेतील एक नाराज गट या निवडणुकीला अपक्ष म्हणून सामोरे जात आहेत. या उमेदवारांमुळे सारी गणित फिस्कटण्याची चिन्हे आहेत. मात्र, आता अर्ज माघारीसाठी राजकीय पक्षांनी माेर्चेबांधणी केली असून, शेवटच्या दिवशी काेण काेणाचे ऐकणार हेच पाहायचे आहे.