ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 5 - रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या प्रसुती विभागात रेखा गांगरकर व अंजली हेळकर दोन महिलांच्या प्रसुतीनंतर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आणि या दोन मातांना वाचविण्यासाठी, त्यांना आवश्यक असलेल्या दुर्मीळ गटातील रक्त मिळवण्यासाठी रुग्णालयातील सर्वच कर्मचा-यांनी पायांना चाके लावल्याप्रमाणे धावाधाव केली. या प्रसंगाच्यावेळी संपूर्ण जिल्हा रुग्णालयच त्या मातांचे कुटुंब बनले. सर्व विभागांच्या सांघिक कार्यातूनच त्या दोन मातांना जीवनदान मिळाले. वेळ काळ न बघता धावलेल्या रक्तदात्यांच्या रक्तामुळे माणुसकीचा रंग अधिक गहिरा झाला. माणुसकीचा हा झरा अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून गेला.
लांजा ग्रामीण रुग्णालयात प्रसुती उपचार घेणाºया रेखा गांगरकर या महिलेच्या आरोग्याबाबत काही गुंतागुंत दिसून आल्याने २ एप्रिलला रात्री तिला प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिका निकिता हळदवणेकर यांनी योग्य निर्णय घेतला होता. ३ एप्रिलला रात्री २ वाजता गांगरकर यांना मुलगी झाली. मात्र, रक्तस्त्राव थांबेना. त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ३ ग्रॅम एवढे खाली आले. किमान ७ ते १० ग्रॅम हिमोग्लोबिन असणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला. त्यांच्यासाठी ओ निगेटिव्ह गटाचे रक्त मिळणे अत्यंत आवश्यक होते. रक्तपेढीमध्ये या गटातील रक्ताचा साठा नव्हता. मध्यरात्री रक्त मिळविणे ही तारेवरची कसरत होती.
अखेर रक्तपेढी तंत्रज्ञ विक्रम चव्हाण यांनी हा रक्त गट असलेल्या कुवारबाव येथील प्रसाद विश्वनाथ साळवी यांना रात्री २.१५ वाजता फोन केला. साळवी यांनीही तातडीने रुग्णालयात धाव घेतली. त्यांचे रक्त घेण्यात आले. रक्तपेढी तंत्रज्ञ चव्हाण यांनी सर्व चाचण्या घेतल्यानंतर गांगरकर यांना रक्त पुरविण्यात आले. त्यानंतर आणखी काही रक्तदात्यांचेही रक्त घेण्यात आले. गांगरकर यांचा जीव वाचवण्यासाठी पहाटेपर्यंत सर्व घटक असलेल्या ओ निगेटिव्ह रक्ताच्या दोन पिशव्या व रक्तातील प्लाझमा घटक असलेल्या चार पिशव्या रक्त देण्यात आले. गांगरकर यांच्यासाठी योगेश भिकाजी वाघधरे, राहुल दत्ताराम कळंबटे, अजय सूर्यकांत देवरुखकर, श्रेयस लाड, वैभव विकास हळदवणेकर, नरेश वसंत जोशी (जिल्हा रुग्णालय कर्मचारी) व प्रसाद साळवी यांनी रक्तदान केले. त्यानंतरही त्यांच्या जीवाचा धोका टळला नव्हता. अखेर डॉक्टर्सनी त्यांच्यावर पहाटे ३ वाजता गर्भाशयाची यशस्वी शस्त्रक्रिया केली.
वृत्तवाहिनीवरील आवाहनानंतर अंजलीला मिळाले दुर्मीळ ‘बॉम्बे’ गटाचे रक्त...
करबुडे गावात चिरेखाणीवर काम करणाºया व जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी २ एप्रिलला दाखल झालेल्या अंजली सचिन हेळकर (रा. मूळ सोलापूर) या महिलेच्या रक्तातही हिमोग्लोबिन अत्यंत कमी आढळले. त्यामुळे त्यांना रक्ताची आवश्यकता होती. पहिल्या चाचणीत अंजली यांना ओ पॉझिटिव्ह रक्तगट आला. मात्र, त्यानुसार रक्त पिशव्या अंजलीच्या रक्ताशी जुळेनात, असे आढळले. त्यानंतर पॅथॉलॉजिस्ट डॉ. गौरी ढवळे व तंत्रज्ञ गौरी सावंत यांनी पुन्हा तपासणी केली असता अत्यंत दुर्मीळ असा बॉम्बे रक्तगट आढळून आला. या गटाचे रक्तच उपलब्ध नसल्याने दात्यापर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर यांनी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून रक्तदात्यांना आवाहन केले. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील बॉम्बे रक्तगट असलेल्या विक्रम यादव यांनी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील अधिपरिचारक शाईन मॅथ्यू यांच्याशी संपर्क साधला. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ते तासगावहून त्यांच्या मित्रासोबत मोटारसायकलने रत्नागिरीकडे निघाले. रात्री ११ वाजता जिल्हा रुग्णालयात पोहोचले. मंगळवारी सकाळी त्यांनी रक्तदान केल्यानंतर ते अंजली हेळकर यांना देण्यात आले. त्यानंतर हेळकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, बाळ व माता सुखरूप असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. आवाहनानुसार उत्स्फूर्तपणे बॉम्बे गटातील रक्तदान करणाºया विक्रम यादव यांचा मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात शल्यचिकित्सक डॉ. आरसूळकर यांच्या हस्ते निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यादव यांनी आतापर्यंत ४२ वेळा रक्तदान केले आहे.
अनेक डॉक्टर्सचे योगदान : अख्खी रात्र जीवनमरणाच्या लढाईत...
डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचारी तसेच रक्तदाते यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शस्त्रक्रियेसाठी गिरीश करमरकर, संजीव पावसकर, पुरुषोत्तम काजवे, प्रतीक्षा पवार, पाडवी जर्मनसिंग, काकडे या डॉक्टर्सनी योगदान दिले. अधिपरिचारिका रेखा काटे व पूर्वा पावसकर, शस्त्रक्रियागृहामध्ये सुमन कोलापटे व अतिदक्षता विभागात दिव्या कोळेकर यांनी या आणीबाणीच्या काळात आपली कामगिरी चोखपणे बजावली.
रुग्णालय आले मदतीला
रुग्णालयातील सर्व विभागांतील कर्मचारी यावेळी आपल्याच कुटुंबावरील प्रसंग असल्याप्रमाणे मदतीला धावून आल्याने गांगरकर यांचा जीव वाचला. गांगरकर यांना सकाळी पुन्हा रक्त पुरवठ्याची गरज भासली. त्यावेळी रक्तपेढीतील जनसंपर्क अधिकारी व कार्यरत तंत्रज्ञ श्रीमती डोंगरकर, श्रीमती खलीफे, सावंत तसेच जीवदान ग्रुप व जाणीव फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ओ निगेटिव रक्ताच्या आणखी चार पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या. गांगरकर यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
बॉम्बे रक्तगट आहे तरी काय?
‘बॉम्बे’ हा जगातील अत्यंत दुर्मीळ असा रक्तगट आहे. जागतिक लोकसंख्येपैकी फक्त चार दशसहस्त्रांश लोकसंख्या बॉम्बे ब्लड गु्रुपची आहे. मुंबईत या गटातील सर्वाधिक ३५ ते ४० जण आढळून आल्याने या रक्त गटाला बॉम्बे असे नाव देण्यात आले. देशात या रक्तगटाचे १७९ जण आहेत, तर या गटातील २६० जणांचा आंतरराष्ट्रीय समूहही कार्यरत आहे. हाच रक्तगट प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या अंजली हेळकरचा असल्याचे उघड झाल्यानंतर हे रक्त मिळवायचे कसे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. हे रक्त रक्तपेढीत साठवून ठेवल्यास रुग्ण अत्यल्प असल्याने रक्त वाया जाण्याची शक्यताच अधिक असल्याचे अधिपरिचारक मॅथ्यू म्हणाले.