रत्नागिरी : विभागीय शिक्षक भरती झालीच पाहिजे, विभागीय भरतीचा शासन निर्णय निर्गमित करा, स्थानिकांची टक्केवारी जाहीर करून त्यांना न्याय द्या, शिक्षणमंत्र्यांच्या विभागीय भरतीला आमचा पाठिंबा... विदर्भ, मराठवाड्यासाठी प्रत्येक वेळी कोकणचा बळी का?, शाळा आमची पोरं आमची मग बाहेरच्या जिल्ह्यातील शिक्षक कशाला? अशा घोषणांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर जिल्ह्यातील डीएड्, बीएड् धारकांनी दणाणून सोडला.विभागीय शिक्षक भरतीसाठी कोकण डीएड्, बीएड् धारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन करून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घोषणेला पाठिंबा दिला. शिक्षकांच्या जिल्हा बदलीच्या समस्येवर उपाययोजना करायची असेल, कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवायच्या असतील, तर विभागीय भरतीशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली.या आंदोलनावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष संदीप गराटे, उपाध्यक्षा भाग्यश्री रेवडेकर-करंडे, सचिव संदेश रावणंग, प्रभाकर धोपट, कल्पेश घवाळी, राजेश इंगळे, तेजस्विनी सावंत देसाई, योगेश मोरे, दीपाली किंजळे, प्रथमेश गोडबोले, प्रियंका नाखरेकर, श्रद्धा कदम यांच्यासह सदस्य उपस्थित होते.शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरती विभाग स्तरावर करण्याचे आश्वासन विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिले आहे. या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. या शिक्षक भरतीसाठी टीएआयटी परीक्षा झाली असून, भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तत्पूर्वी विभागीय शिक्षक भरतीचा शासन निर्णय काढून विभागीय आरक्षणाची टक्केवारी जाहीर करावी, अशी शिक्षकांची मुख्य मागणी आहे.
विदर्भ, मराठवाड्यासाठी कोकणचा बळी का?; रत्नागिरीत आंदोलनकर्त्यांचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 12:32 PM