खेड : राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. मात्र, हे पक्ष स्थानिक पातळीवर एकमेकांविरोधात काम करत आहेत. जिल्ह्यात आघाडीचा धर्म फक्त राष्ट्रवादीनेच पाळायचा का, असा प्रश्न
राष्ट्रवादीच्या सुसेरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या नफिसा परकार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे
उपस्थित केला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवरून नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर त्या ठाम आहेत. या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व खाडी पट्टा विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी आपण फक्त आघाडीचा धर्म पाळला, अशी भावना व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर परकार यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांना
जिल्हा परिषद निवडणुकीत सहभागी का होऊ दिले नाही, पक्षाने व्हीप का बजावला नाही, आघाडीचा धर्म पाळण्याचा ठेका राष्ट्रवादीनेच घेतला आहे का, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. जिल्हाध्यक्षांनी महाविकास आघाडीतील इतर पक्षांतील नेत्यांसोबत चर्चा करून राष्ट्रवादी
सदस्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळवून
देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसे न झाल्यास
आपल्याला निर्णयावर ठाम राहण्यापासून रोखू शकत
नाही, असेही परकार यांनी ठणकावले आहे.