शनिवारी, रविवारी समुद्रकिनारे गर्दीने फुलत आहेत. गर्दी पाहून सोशल डिस्टन्सिंग हरवल्याची प्रचिती येत आहे. काही मंडळी तर विनामास्क फिरत आहेत. अशामुळे कोरोना संक्रमण वाढेल की कमी होईल, याबाबत मात्र शंका आहे.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा अहोरात्र धडपडत आहे. ऊन-पावसाचा सामना करत पोलीस यंत्रणा रस्त्यावर तैनात आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार सरकारी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे. काेरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत तर नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य यंत्रणा खबरदारी घेत आहे. असे असताना नागरिकांमधील बेजबाबदार वृत्तीमुळे कोरोना संक्रमण वाढतच आहे.
एकीकडे कोरोनाच्या निर्बंधांमुळे व्यावसायिक वैतागले आहेत. दुसरीकडे महागाईने सर्वसामान्य पोळत आहेत. गेल्या दीड वर्षात उद्योग-व्यवसायांना झळ बसल्यामुळे कित्येकांना नोकरी, रोजगार गमवावे लागले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार सुरू करण्याची मागणी केली जात आहे. लाॅकडाऊन व अनलाॅक काळातील रूग्णसंख्या थोड्याफार फरकाने सारखीच आहे. त्यामुळे निर्बंध हटविण्याची मागणी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने प्रशासन धोका पत्करायला तयार नाही. कोरोनामुळे सर्वसामान्य माणूस मात्र चांगलाच भरडला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्याने ऑनलाईनचा पर्याय निवडण्यात आला आहे. मात्र ऑनलाईन अध्यापनाचे फायदे-तोटे सर्वांनाच उमगले आहेत. या पध्दतीमुळे मुलांना कितपत आकलन होत आहे, हा जरी प्रश्न असला तरी मोबाईलच विश्व मानून तासनतास मुले त्यामध्ये व्यस्त राहात आहेत. या पध्दतीमुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. जागरुक पालक मुलांची काळजी घेत असले तरी कित्येक मुले अबोल, चिडचिडी झाली आहेत. खासगी शिकवण्या, अन्य कलेबाबतच जादा वर्ग शिवाय ऑनलाईन अध्यापन पध्दतीमुळे मुलांची जीवनपध्दतीच बदलली आहे. मुले, खेळ-मैदाने विसरली आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुले शाळेत जात नसली तरी ऑनलाईन अध्यापन मात्र खर्चिक झाल्याने पालक हैराण आहेत. ग्रामीण भागात ज्याठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही, तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे बाधित क्षेत्र घोषित केले असल्याने मुलांना स्वाध्याय पुस्तिकांव्दारेच अध्यापन करावे लागत आहे. एकूणच शैक्षणिक क्षेत्रातही बोजवारा उडाला आहे. कोरोनामुळे ‘काही सुपात तर काही जात्यात’ अशी विचित्र स्थिती निर्माण झाली असून, त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.