जिल्ह्याला हा दिलासा मिळत असतानाच मार्च महिन्यात होणाऱ्या शिमगोत्सवात काळजी घ्या, असा सल्लाही आरोग्य विभागाकडून मिळत होता. मात्र, काही गावांच्या, व्यक्तींच्या अट्टाहासामुळे शिमगाेत्सवात लाेकांनी दाखवलेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाचे संकट पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले. तसं पाहिलं तर डिसेंबर महिन्यापर्यंत घरातच अडकलेल्या लोकांनी जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात पर्यटनाला जाण्याचे बेत केले. ये-जा वाढली. त्यामुळे कोरोनाचे पुन्हा दबक्या पावलांनी ‘कम बॅक’ झालेलेच हाेते. त्यात भर पडली ती शिमगोत्सवावेळी पुन्हा हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबई - पुणेसारख्या शहरातून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची. महत्त्वाचे म्हणजे त्यानंतरच्या कोरोनाचे दुसऱ्या लाटेत रूपही बदललेले होते. यात कोरोनाची लक्षणे सौम्य असली तरी त्याचा संसर्ग जलद गतीने फैलावणारा असल्याने बाधित हाेणाऱ्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा कंबर कसून उभी राहिली.
यात धोकादायक ठरलेली परिस्थिती म्हणजे साैम्य किंवा अजिबातच लक्षणे नसलेल्या व्यक्तींना शासनानेच घरात राहून उपचार घेण्याची परवानगी दिल्याने ज्यांच्यात लक्षणे नव्हती किंवा कमी लक्षणे होती, अशा व्यक्ती बाहेर फिरू लागल्या. पूर्वीसारखे त्या घरावर शिक्का मारणे किंवा तो परिसर सील करणे हे नियम राहिले नसल्याने काहींच्या हे पथ्यावर पडले. त्यामुळे बाहेर फिरणाऱ्यांनी घरातले आणि बाहेर संपर्कात येणारे यांनाही एकाचवेळी बाधित करण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढली. अजूनही जलदगतीने होणाऱ्या फैलावामुळे मार्च २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत रूग्णांची संख्या होती १०,२८१ आणि मृत्यू झालेल्यांची संख्या होती ३७१. मात्र, त्यानंतर नागरिकांनीच बेफिकिरी दाखविल्याने त्यानंतरच्या ३ महिन्यात रूग्णसंख्या पोहोचलीय ४५,३१३वर आणि मृत्यू झालेत १,५४५. निदान आता तरी यातून धडा घेऊया.