रत्नागिरी : बारसू (ता. राजापूर) येथे होणाऱ्या केंद्र सरकारच्या बहुचर्चित रिफायनरी प्रकल्पात उपयोगात येणारे पाणी आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पुनर्वापर प्रक्रिया यांचा वापर करून त्याचा पुनर्वापर या रिफायनरीमध्येच करण्यात येणार आहे. त्यामुळे हे पाणी बाहेर सोडले जाणार नाही. या प्रकल्पात शून्य द्रव उत्सर्जित होणार असल्याने कोकणच्या दृष्टीने पर्यावरणाला पूरक असणारा असा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प प्रदूषणकारी असल्याने रत्नागिरीला हानिकारक असल्याचे विरोधकांकडून म्हटले जात असल्याने यातून या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. २० एमएमएटीपीए एवढ्या क्षमतेच्या या रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार एकर आणि क्रूड ऑइल टर्मिनलसाठी १,००० एकर जागा लागणार आहे.प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा हरित असल्याने जगातील बहुतेक रिफायनरीपेक्षा अधिक हरित आणि स्वच्छ असणार आहे. ही रिफायनरी हरित करण्यासाठी विशिष्ट अशी रचना करण्यात आली आहे. या रिफायनरीमध्ये उपयोगात येणारे पाणी आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक पुनर्वापर प्रक्रिया यांचा वापर करून रिफायनरीमध्येच पुनर्वापर होणार आहे. त्यामुळे हे पाणी बाहेर सोडले जाणार नाही. कार्बन उत्सर्जन कमीत कमी असणारी जागतिक दर्जाची ऊर्जा आणि तंत्रज्ञानाचा वापर होणार असून वायू उत्सर्जन करताना ऑनलाइन तपासणी यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यायोगे वायू परिमाण सातत्याने तपासणी नियंत्रित केली जाणार आहे. कमी कार्बन उत्सर्जन असणाऱ्या इंधनांचा वापर करण्यात येणार आहे.
कसा असेल प्रकल्प -- दाेन लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित.- भारतातील सार्वजनिक तेल क्षेत्रातील इंडियन ऑइल काॅर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड या प्रमुख तेल कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढे.- साैदी येथील M/S Saudi Aramco आणि यूएई येथील ADNOC दोन जागतिक स्तरावरील कंपन्या गुंतवणुकीसाठी इच्छुक.