रत्नागिरी : शहरात नळपाणी योजनेचे काम सुरू असून, या योजनेची मुदत दिनांक ३१ मार्च रोजी संपत आहे. मात्र, अद्याप काही कामे प्रलंबित असल्याने डिसेंबर २१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय सुधारित पाणीयोजनेच्या जलवाहिन्या टाकताना शहराजवळील काही भागात खोदाई होणार आहे, त्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेने २३ लाख ५० हजार भरण्याचे पत्र नगरपरिषदेला दिले आहे. त्यामुळे संबंधित रस्ते जिल्हा परिषदेचे आहेत की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, याची खात्री करून भरपाई देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दिली.
रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली, त्यावेळी नळपाणी योजनेसाठी मुदतवाढ व नुकसान भरपाईबाबत खात्री करण्याबाबतचे निर्णय घेण्यात आले. शहरासाठीच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी शहरालगतच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची खोदाई करावी लागणार आहे. यासंदर्भात रस्त्यांची दुरूस्ती व परवानगीसाठी जिल्हा परिषदेने २३ लाख ७० हजार रुपये भरण्यासाठीचे पत्र नगर परिषदेला दिले आहे. जिल्हा परिषदेच्या या पत्रावर निर्णय घेण्यासाठीचा विषय सभेसमोर मांडण्यात आला होता. नाचणे जलशुध्दीकरण केंद्र ते गोडाऊन स्टॉप, जलशुध्दीकरण केंद्र ते नाचणे या रस्त्यावर दोन्ही बाजूने खोदाई करून जलवाहिनी टाकण्यात येत आहे. हा रस्ता नक्की कोणाचा आहे, याची खात्री करूनच पैसे भरावेत, अशी सूचना नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी केली आहे.
शहराची नळपाणी योजना दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. वास्तविक गेली तीन वर्षे नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. गतवर्षी लॉकडाऊनमुळे काम ठप्प झाले होते. ठेकेदाराने दिनांक ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ मागितली होती. मात्र, तरीही काम पूर्ण न झाल्याने ठेकेदार कंपनीने दिनांक ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढीसाठी मागणी केली होती. सर्वसाधारण सभेसमोर याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी नळपाणी योजनेच्या मुदतवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला. सभेमध्ये सर्वानुमते डिसेंबर २०२१ पर्यंत नऊ महिन्यांची फेरमुदतवाढ देण्यात आली आहे.