रत्नागिरी : कोरोना काळात आलेल्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार तपासणी नाक्यांवर गोळा केली जाणारी माहिती ग्राम कृती दलाकडे पाठविण्यात येत असून, सर्वच जबाबदारी ग्राम कृती दलांकडे देण्यात आली आहे. जिल्ह्यातील गावांची संख्या जास्त आणि ग्रामपंचायतींची संख्या कमी असल्याने या सर्व जबाबदारी पेलताना ग्राम कृती दलाच्या नाकीनऊ येणार असून, ऐन सणात तारेवरची कसरत होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या तपासणीचा गोंधळ अधिक वाढणार आहे.
जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला जावा, या अनुषंगाने शनिवारी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याबाहेरून एस. टी., रेल्वे अथवा खासगी वाहनाने येणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्हीही डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र तपासणी नाक्यावर सादर करावे लागणार आहे किंवा ७२ तासांपूर्वी कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. हे दोन्ही नसल्यास कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, तपासणी नाक्यावरील प्रवाशांची संकलित केलेली माहिती संबंधित तहसीलदारांकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत ती ग्राम कृती दलांकडे पाठविण्यात येणार आहे.
या आदेशात नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या गावातील ग्रामस्थांची माहिती संकलित करणे, आवश्यक असल्यास त्याची स्थानिक आरोग्य यंत्रणेमार्फत आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी या चाचणी पाॅझिटिव्ह आल्यास त्याला विलगीकरणात ठेवण्याची जबाबदारीही ग्राम कृती दलाकडे देण्यात आली आहे. कोरोनाबाधित असलेल्यांना कोराेना केअर सेंटरमध्ये दाखल करणे तसेच लक्षणे नसल्यास त्यांना विलगीकरण केंद्रात दाखल करणे व त्यासाठी विलगीकरण केंद्र उभारण्याची जबाबदारीही ग्राम कृती दलाकडे देण्यात आली आहे. हा सर्व अहवाल पुन्हा तहसीदारांकडे पाठवावा लागणार आहे.
ग्राम कृती दलांकडे तहसीलदारांमार्फत प्रवाशांची यादी आल्यानंतर त्यांची माहिती संकलित करणे, त्याचबरोबर येणाऱ्यांची चाचणी करून त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवणे आणि त्यांना या विलगीकरणात सुविधा देणे, हेही काम या ग्राम कृती दलांच्या सदस्यांना करावे लागणार आहे. आधीच कृती दलांच्या सदस्यांची संख्या कमी आहे तसेच अनेक गावे दुर्गम आहेत. त्यामुळे प्रत्येक चाकरमान्यांपर्यंत पोहोचताना अनेक अडचणी येणार आहेत. त्यामुळे कृती दल पोहोचण्याआधीच चाकरमानी घरी पोहोचण्याची शक्यता आहे. यातूनही संसर्गाचा धोका वाढू शकतो.
गावे १५३१, ग्राम कृती दले ८४५
जिल्ह्यातील गावांची संख्या १,५३१ असून ८४५ ग्रामपंचायती आहेत. यात काही ग्रुप ग्रामपंचायती आहेत. गावांची संख्या अधिक आणि कृती दलांची संख्या कमी, त्यातच अनेक गावे दुर्गम भागात असल्याने ग्राम कृती दल बाहेरून येणाऱ्या ग्रामस्थांपर्यंत वेळेत कसे पोहोचणार, हा प्रश्न आहेच. शिवाय प्रत्येकाच्याच घरी गणपतीचा सण आहे. ऐन सणात ग्राम कृती दलाची धावपळ होणार आहे.