रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत झालेल्या रत्नागिरी तालुका संगणक परिचालकांच्या बैठकीत संगणक परिचालकांच्या मानधनवाढीबाबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या आठ दिवसात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे समवेत सभा घेऊन आपल्या मानधन वाढीबाबत व अन्य समस्यांबाबत चर्चा करण्याचे आश्वासन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.रत्नागिरी तालुका संगणक परिचालक संघटनेतर्फे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत संगणक परिचालकांच्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायतीकडून निधी वर्ग होऊन सुध्दा मानधन अनियमित असल्याबाबत लक्ष वेधण्यात आले. महागाईने कळस गाठला असतानाही, संगणक परिचालकांना तुटपूंज्या मानधनातच गुजराण करावी लागत आहे. याशिवाय अन्य विविध समस्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उद्योगमंत्री सामंत यांनी मानधन वाढीबाबत ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. चर्चेवेळी संघटना प्रतिनिधींनाही मंत्रालयात बोलावणार असल्याचे सांगितले.यावेळी रत्नागिरी तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष समीर गोताड, आसिफ नाकाडे, वैभव गुरव, निलेश शिंदे, ईशिता सावंत, संजना शेवडे, निशिगंधा घाटविलकर, सुचिता कांबळे, अमित रेवाळे, दिपक कांबळे, नितीन सागवेकर, शिवराज भोवड, भूषण सुर्वे, चंद्रकांत लिंगायत आदि संगणक परिचालक उपस्थित होते.
संगणक परिचालकांच्या प्रश्नाबाबत ग्रामविकास मंत्र्यांसमवेत चर्चा करणार : मंत्री सामंतांचे आश्वासन
By मेहरून नाकाडे | Published: November 05, 2022 6:41 PM