रत्नागिरी : गेले चार दिवस कडकडीत पडलेली थंडी पुन्हा गायब झाली आहे. कोकणच्या अर्थकारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या आंबा पिकाचा हंगाम थंडीअभावी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. मात्र, डिसेंबर संपत आला तरी अधूनमधून थंडी गायब असल्याने आंबा कलमांची मोहोर प्रक्रिया तुरळक स्वरुपात सुरु झाली आहे.थंडीऐवजी वारंवार ढगाळ वातावरण त्यातच अवकाळी पावसाची हजेरी राहिली आहे. जमिनीतील ओलाव्यामुळे ८० टक्के कलमांना पालवी आली. उर्वरित २० टक्के कलमे मोहोरण्याची प्रतीक्षा असताना केवळ ५ ते १० टक्के इतकाच मोहोर झाला आहे. शिवाय मतलई वारेही नसल्याने मोहोर प्रक्रिया सुरु झालेली नाही. पालवी नसलेल्या झाडांना नोव्हेंबर महिन्यात येणारा मोहोर डिसेंबरच्या सुरुवातीला आल्याने मोहोराची प्रक्रिया लांबली आहे.गेले काही दिवस कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २५ अंश सेल्सिअस इतके राहिले आहे. १८ ते २० अंश सेल्सिअस इतके तापमान खाली आल्यास ते हवामान आंब्याला पोषक ठरते. थंडी गायब असून, हवामानातील आर्द्रता वाढली आहे. थंडीऐवजी उकाडा होत आहे. असे वातावरण कीड रोगासाठी पोषक ठरत आहे.मोहोर येणार कधी?रात्री थंडी व दुपारी उष्मा यामुळे झाडांवर ताण येऊन मोहोर प्रक्रिया सुरु होते. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत हिवाळा ऋतू असल्याने मकर संक्रांतीनंतर हवामानात बदल होत जातो. हिवाळ्यातील शेवटचा महिना शिल्लक राहिल्याने थंडी पडणार कधी व मोहोर येणार कधी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
ढगाळ वातारणामुळे कीड, बुरशीजन्य रोगाचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना पालवीचे संरक्षण करावे लागत आहे. पालवी जून होण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी तुडतुडा व खार यांचा प्रादुर्भाव सुरू आहे. यावर्षीचा आंबा हंगाम लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटणार आहे.- टी. एस. घवाळीबागायतदार, रत्नागिरी