टेंभे : जिल्ह्यातून मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. तसेच अपघात क्षेत्रांचे (ब्लॅक स्पॉट) प्रमाणही लक्षणीय आहे. जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी अपघात क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे नवनियुक्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांनी सांगितले.
परिवहन खात्यातील तब्बल ३६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव सुबोध मेडशीकर यांना आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या सर्व पदांवर मेडशीकर यांनी काम केले आहे.
सुबोध मेडशीकर यांची परिवहन विभागात प्रथम १९८६ राेजी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदी बुलढाणा येथे निवड झाली. १९९८मध्ये त्यांना मोटार वाहन निरीक्षक पदावर पुणे येथे पदोन्नती मिळाली. २०१० मध्ये त्यांची सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी पदोन्नती झाली. २०१० ते मार्च २०२१ या कालावधीमध्ये त्यांनी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर नांदेड, सोलापूर व पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात काम केले आहे. एप्रिल २०२१मध्ये त्यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.
‘रोड सेफ्टी २०२१’ अंतर्गत नागरिकांची जनजागृती करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी - चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची युनिफॉर्मवर पिंपरी - चिंचवड ते लोणावळा सायकल रॅली विशेष लक्षवेधक ठरली होती.
जिल्ह्यातील नागरिकांना कार्यालयीन कामकाजात कोणताही त्रास होऊ नये यासाठी कार्यालयीन कामकाजावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे तसेच कामकाज गतिमान व पारदर्शक करण्यावर अधिक भर देणार असल्याचे सुबोध मेडशीकर यांनी सांगितले.