रत्नागिरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील मुलांना दरवर्षी मोफत दोन गणवेश देण्यात येतात. जिल्ह्यात एकूण ५२ हजार ९२० विद्यार्थी असून, त्यांच्या गणवेशाकरिता यंदा १ कोटी ६७ लाख ६३ हजार रूपयांचाच निधी मिळाला असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला एकाच गणवेशापुरतेच म्हणजे सुमारे ३०० रूपये मिळणार आहेत.शासनाकडून दरवर्षी दोन गणवेश देण्यात येत असल्याने प्राप्त निधी अपुरा होता. शिवाय गणवेशाचे कापड मात्र चांगल्या दर्जाचे असावे, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुकानिहाय शाळांकडे गणवेशाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १ ते ८ वर्गातील सर्व मुलींची संख्या ३८ हजार ७१९ असून, मुलांमध्ये अनुसूचित जाती ३,०५१, अनुसूचित जमाती, १०२७, दारिद्र्य रेषेखालील १० हजार १२३ लाभार्थी विद्यार्थ्यांच्या दोन गणवेशासाठी जिल्हा परिषदेकडून ३ कोटी ३५ लाख २६ हजार रूपयांच्या निधीची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईकडे करण्यात आली होती. मात्र, वाढीव निधी मिळण्याची आशा धुसर झाल्याने अखेर प्राप्त निधी शाळांकडे वर्ग करण्यात आला आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे प्रत्येक शाळेच्या खात्यावर विद्यार्थी संख्येनुसार गणवेशाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या रकमेतून शाळा व्यवस्थापन समितीतर्फे गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येत आहेत.
शिक्षण विभागाकडेच अपुरा निधी प्राप्त झाला असल्याने गणवेश वितरण प्रक्रिया शैक्षणिक वर्ष संपत आले तरी रेंगाळली. यावर्षी शैक्षणिक वर्षातील बहुतांश कालावधीत ऑनलाईन अध्यापन सुरू असल्यानेच बहुधा शासनाने एकाच गणवेशाची रक्कम दिली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.