मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : दहावीनंतर पदवीसाठी पाच वर्षे घालवण्यापेक्षा काैशल्यपूर्ण शिक्षण घेऊन एक-दोन वर्षात आत्मनिर्भर बनण्याकडे काही विद्यार्थ्यांचा कल आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेताना आवडीच्या अभ्यासक्रमाची निवड केली जाते. शासकीय, खासगी संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यात प्रत्येकी एक व रत्नागिरीत मुलींचे एक मिळून दहा शासकीय संस्था व सात खासगी संस्था असून एकूण दोन हजार ९७२ प्रवेश क्षमता आहे. शासकीय संस्थेत २,१७६ तर खासगी संस्थेत ७९६ प्रवेश क्षमता आहे. इलेक्ट्रिशन्स, मोटार मेकॅनिकल, सिव्हिल ड्राफ्समन, मेकॅनिकल ड्राफ्समन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल या ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. ऑनलाईन अर्ज घेण्यात येत असून गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर केली जाणार आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी गर्दी करीत आहेत.
पदवीसाठी पाच वर्षे घालवूनही नोकरी मिळत नाही, बेकार राहण्यापेक्षा एक ते दोन वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला तर रोजगाराची संधी सहज प्राप्त होते. जिल्ह्यातील शासकीय संस्थेत जागा मर्यादित आहेत. खासगी सात संस्था असल्यातरी त्यामध्ये वाढ होणे आवश्यक आहे.
- झिशान काझी, रत्नागिरी
ठराविक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. शासकीय संस्थेत प्रवेश मिळाला नाही तर खासगी संस्थेत प्रवेश घेतला जातो; मात्र या संस्था मोजक्याच आहेत. त्यामुळे संस्थांनी विस्तार वाढविण्याची आवश्यकता असून जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
- शुभम शिंदे, रत्नागिरी
इलेक्ट्रिशन, ड्राफ्समनकडे कल
इलेक्ट्रिशन्स, मोटार मेकॅनिकल, सिव्हिल ड्राफ्समन, मेकॅनिक ड्राफ्समन या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल सर्वाधिक आहे.
त्यानंतर एअर कंडिशन्स, रेफ्रिजरेशन फिटर, टर्नर या प्रकारचे अभ्यासक्रम निवडले जातात.
एकूण जागा व आलेले अर्ज यांची सांगड घालताना गुणवत्तेचा कस लागतो. त्यामुळे अर्ज भरताना क्रमाने अभ्यासक्रमाची निवड विद्यार्थ्यांना करावी लागते.
कॅम्पस मुलाखतीमुळे अभ्यासक्रम पूर्ण होताच नोकरीचा मार्ग मोकळा होतो.
n ठराविक अभ्यासक्रमांकडे ओढा असल्याने तेथे प्रवेश मिळविताना गुणवत्तेचा कस लागतो.
n खासगी व शासकीय संस्थांकडे असलेल्या जागा मोजक्या असल्याने रिक्तचे प्रमाण कमी आहे.
n फ्रंट ऑफिस असिस्टंट, स्टूवर्ड, डीटीपी, सुईंग टेक्नॉलाॅजीच्या काही जागा रिक्त राहिल्या होत्या.