राजापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राजापूर शहरासह ग्रामीण भागात रुग्ण वाढत असून, मृतांची संख्याही वाढत आहे. वेळेत आणि योग्य उपचार मिळत नसल्याने तालुक्यात ही अवस्था आहे. ओणी येथील कोविड रुग्णालय सुरू करणार हे सांगून महिना उलटला तरी ते सुरू झालेले नाही. त्यामुळे मग अशा प्रकारे लोकांचे बळी गेल्यावर हे कोविड रुग्णलय सुरू होणार का, असा सवाल भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केला आहे. पुढील दहा दिवसांत हे रुग्णालय सुरू करावे अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा गुरव यांनी दिला आहे.
राजापूर तालुक्यावर महाविकास आघाडीचे सरकार आणि सत्तेतील शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदार हे अन्याय करत असून कोणत्याही प्रकारे नियोजन नसल्याने आज जनतेला मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोपही गुरव यांनी केला आहे.
राजापूर तालुक्यात अगोदरच आरोग्य सुविधांची वाणवा आहे. त्यातच कोरोनाच्या काळात याचा मोठा फटका जनतेला बसत आहे. कोरोना काळात राजापूर तालुक्यात ओणी येथे कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे महिनाभरापूर्वी सांगण्यात आले. यासाठी आ. राजन साळवी यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, अद्याप हे रुग्णालय सुरू होण्याबाबत कार्यवाही नाही, नुसत्या घोषणा करून आणि निधी देऊन काय होणार, प्रत्यक्षात रुग्णालय सुरू कधी होणार, असा प्रश्न गुरव यांनी केला आहे.
आज अनेक जिल्ह्यांत आणि तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी २०० पेक्षा जास्त सेंटर आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात केवळ आठ ते दहा सेंटर दिली जातात. लसीकरण केंद्रे का वाढविली जात नाहीत, लसीचे जादा डोस का मागितले जात नाहीत, असाही प्रश्न त्यांनी केला आहे़