आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी : झोपडपट्टीवासियांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे मिरकरवाडा स्मशानभूमी परिसरातील झोपड्या सात दिवसात हटविण्याचे आदेश विभागीय वनअधिकाऱ्यांनी दिले आहेत. येथील १६१ झोपडपट्टीवासियांना ही नोटीस देण्यात आली आहे. मिरकरवाडा परिसरामध्ये अनेक अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत़ या झोपडपट्ट्यांमध्ये बहुतेक लोक खलाशी म्हणून काम करणारे परप्रांतीय राहतात़ या झोपडपट्ट्या उठविण्याबाबत प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या़ मात्र, अद्यापही या झोपडपट्ट्या जैसे आहेत़ याच भागात स्मशान भूमीशेजारील जमीन वनक्षेत्रासाठी राखीव आहे़ या जमिनीवर उभारण्यात आलेल्या १६१ झोपड्या अनधिकृत आहेत़ वनविभागाने या झोपड्या हटविण्यासाठी नोटीस दिल्या होत्या. मात्र, वनविभागाकडून नोटीस मिळाल्यानंतर झोपडपट्टीधारकांनी वनविभागाविरुध्द न्यायालयात धाव घेतली होती़ आता जिल्हा न्यायालयानेही झोपडपट्टीधारकांचा दावा फेटाळून लावला आहे़ त्यामुळे या अनधिकृतपणे झोपड्या तोडण्याची नोटीस विभागीय वनअधिकारी वि़ रा़ जगताप यांनी बजावली आहे़ नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांत ही अतिक्रमण केलेल्या झोपड्या पाडून टाकाव्यात अन्यथा शासकीय खर्चाने काढून टाकून येणारा खर्च वसूल करण्यात येईल, असे वनविभागाने कळविले आहे़ (शहर वार्ताहर) राजकीय पुढाऱ्यांकडे धाव या झोपडपट्टीधारकांना राजकीय लोकांकडून मोठा आधार आहे़ मतांवर डोळा ठेवून राजकीय मंडळी निवडणुकीमध्ये झोपडपट्टीवासियांचा वापर करुन घेतात़ त्यामुळे या झोपडपट्टीधारकांनी राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडे धाव घेतली आहे