शिवसेना इतरांना सत्तेत वाटा देणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 10:55 AM2020-12-16T10:55:44+5:302020-12-16T10:58:45+5:30
Politics, Shiv Sena, Ratnagiri, gram panchayat रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी होणार की, केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पारंपरिक आघाडी होणार, याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी होणार की, केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पारंपरिक आघाडी होणार, याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवसेना हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याने ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेत वाटा देणार का, हाच मोठा प्रश्न कार्यकर्तांना पडला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची ताकद सर्वात मोठी आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकांपासून जिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी ३९ जागा शिवसेनेकडे आहेत. राष्ट्रवादीकडे १५, तर काँग्रेसकडे १ जागा आहे. भाजपला जिल्हा परिषदेत एकही जागा मिळाली नव्हती.
२०१७ सालापासून आतापर्यंत अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन जागा शिवसेनेने, तर दोन जागा राष्ट्रवादीने मिळवल्या. अर्थात तरीही शिवसेनेची तळागाळातील ताकद मोठी आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये ही ताकद दिसली आहे.
शिवसेनेची ताकद अधिक असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांना ते सोबत घेणार की, आपली ताकद कायम ठेवून स्वतंत्र लढणार, हा प्रश्नच आहे. निवडणुका जवळ आल्या तरी या तीनही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झालेली नसल्याने अजून हा प्रश्न अधांतरीच आहे.
तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?
राष्ट्रवादी आणि काँग्रेस यापैकी राष्ट्रवादीकडे जिल्ह्यात काही ना काही ताकद आहे. काँग्रेस गेल्या काही वर्षात क्षीण झाली आहे. राष्ट्रवादीकडे ताकद असली तरी त्यालाही मर्यादा आहेत. त्या तुलनेत शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाविकास आघाडी होण्यामध्ये अधिक स्वारस्य आहे. आता प्रश्न हाच आहे की, शिवसेना या पक्षांना सामावून घेणार का?
स्थानिक संस्थांमध्ये शिवसेनेचा दबदबा
जिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी ३५ जागा शिवसेनेकडे आहेत. १५ जागा राष्ट्रवादीकडे, तर १ जागा काँग्रेसकडे आहे. पंचायत समितीच्या ११० जागांपैकी ७३ जागा शिवसेनेकडे आहेत. २९ जागा राष्ट्रवादीकडे, ४ जागा भाजपकडे तर ३ जागा काँग्रेसकडे आहेत. तळागाळात शिवसेनेचाच वाटा खूप मोठा आहे. शिवसेनेने उदय सामंत यांच्या रूपाने रत्नागिरीला मंत्रीपद दिले असल्याने त्यातूनही शिवसेनेने जिल्ह्यात हातपाय पसरले आहेत.
स्थानिक स्तरावर अजून आघाडी नाही
राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर स्थानिक पातळीवर अजून निवडणूक झालेलीच नाही. त्यामुळे अजून स्थानिक पातळीवर अशी आघाडी झालेलीच नाही. चिपळूण नगर परिषद आणि चिपळूण पंचायत समितीत निवडणूकपश्चात महाविकास आघाडी झाली आहे. मात्र, इतरत्र शिवसेनेने बाकी पक्षांना सोबत घेतलेले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये अजूनही शिवसेनेने राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला सत्तेत सामावून घेतलेले नाही.