गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आला असून, याबाबत स्थानिक प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उपोषणाला बसणार असल्याचे सुमंत केळकर यांनी सांगितले.जागतिक धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणाऱ्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिराकडे जाणारा आपटा तिठा ते मोरया चौक हा मुख्य मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आला आहे. याबाबत सुमंत केळकर यांनी वारंवार स्थानिक प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मार्गावरील मथुरा लॉजसमोरील रस्ता वारंवार ढासळत असून केळकर कुटुंबीय वारंवार या रस्त्याच्या कडेची दगड माती लावून दुरुस्ती करत असतात. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पर्यटक गाड्या पार्किंग करतात. त्यामुळे येथील बांध ढासळत असून, मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.या ठिकाणी गॅस एजन्सी व लॉजिंग पार्किंग असल्याने रस्त्यावरील गाडी तेथून खाली पडल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांनी पाहणी करून योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी. संबंधित यंत्रणांनी याबाबत कार्यवाही न केल्यास आपण उपोषणाला बसणार असल्याचे सुमंत केळकर यांनी सांगितले.
गणपतीपुळे मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग बंद होणार?, मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 4:01 PM