रत्नागिरी : चौथ्या स्तरात लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना रूग्णसंख्या कमी होतेय, असा दिलासा मिळत असतानाच अचानक २२ जून रोजीच्या अहवालात एकदम ९,१९५ रूग्ण २४ तासात वाढले. त्यामुळे ४८,७३१वरून जिल्ह्याची रूग्णसंख्या ५७,९२६ झाल्याने जिल्हा हादरला. रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी कोरोना रूग्ण वाढलेल्या सात जिल्ह्यांना निर्बंध शिथील करण्याची घाई करू नका, असे सुनावल्याने आता पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन करण्याची वेळ येणार का, अशी संभ्रमावस्था नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधित रूग्ण आणि कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या यात तफावत असल्याचे दिसू लागले आहे. आधीच कोरोनाच्या रूग्णांची संख्या दरदिवशी ५०० ते ७०० दरम्यान येत आहे. असे असताना २१ रोजीच्या आकडेवारीत एकूण रूग्णांची संख्या ४८,७२१ नमूद केली होती. मात्र, २२ रोजी सापडलेल्या रूग्णांची संख्या ५१९ आणि एकूण रूग्णांची संख्या ५७,९२६ एवढी नमूद करण्यात आल्याने एका दिवसात नेमके सापडले किती, हा प्रश्न निर्माण झाला. याबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट करताना रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या राज्यभरातील इतर रूग्णांचा समावेश शासनाच्या कोविड १९ पोर्टलवर होत असल्याचे सांगितले. याचदिवशी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ९ रूग्ण सापडल्याचा गौप्यस्फाेट आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी केला. त्यामुळे पोर्टलवरील रूग्णसंख्येत दिसणारी वाढ लक्षात घेता, पुन्हा लाॅकडाऊन होणार की काय, ही भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रूग्णांनी जिल्ह्याची चिंता वाढवली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढती आहे, अशा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्याची घाई नको, असे या जिल्हा प्रशासनांना गुरूवारी झालेल्या व्हीसीत बजावले आहे. त्यामुळे आता पुन्हा या जिल्ह्यांवर कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंट रूग्णाच्या मृत्यूने काळजी वाढली
संगमेश्वर तालुक्यात सापडलेल्या ९ व्हेरिएंट रूग्णांपैकी आठ रूग्ण बरे झाले असले तरी आरोग्य विभागाकडून एका महिला रूग्णाचा मृत्यू १३ रोजी झाल्याचे शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या सात जिल्ह्यांना डेल्टा प्लसच्या अनुषंगाने अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याने लाॅकडाऊनचे संकेत मिळत आहेत.
व्हिडीओमुळे संभ्रम
उच्च् व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा जिल्ह्यात दि. १ ते ८ जुलै या कालावधीत कडक निर्बंध घालण्यात येणार असल्याचा एका वृत्त वाहिनीवरील जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ शुक्रवारी वेगाने व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला. अखेर ही मुलाखत गेल्यावर्षीची असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांना हायसे वाटले.