चिपळूण : विल्ये गावात प्रत्येक घरात जाळीच्या चुली बसवून संपूर्ण गाव धूरमुक्त करुया, असा निर्धार सरपंच मीना कांबळे यांनी व्यक्त केला. सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूणच्या धूरमुक्त चुली वापरा व कोकण धूरमुक्त करा, हे अभियान सुरु असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी विल्ये ग्रामपंचायतीमध्ये कार्यशाळा पार पडली. यावेळी सह्याद्री निसर्ग मित्रचे भाऊ काटदरे, सचिन मोरे, योगिराज राठोड यांनी मार्गदर्शन केले. सुधारित चूलविषयक ‘लोकमत’मध्ये आलेली बातमी वाचल्यानंतर विल्येचे ग्रामस्थ श्रीकांत सावंत यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्या मदतीने सभा आयोजित केली. सर्वांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ग्रामसेवक एल. एच. पासवे यांनी प्रास्ताविक केले. पर्यावरणाचे रक्षण करणे व गावच्या आरोग्यासाठी निर्धूर चूल आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीकांत सावंत यांनी उपस्थितांची ओळख करुन दिली. सरपंच कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पारंपरिक चुलीमुळे किती नुकसान होते हे भाऊ काटदरे यांनी सांगितले. यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांची माहिती दिली, तर निर्धूर चुलीसाठी फक्त ८० रुपये खर्च येतो. त्यासाठी आपली पारंपरिक चूलही आपण वापरू शकतो. सुधारित चूल वापरल्यास होणारे फायदे त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या शेवटी काटदरे यांनी स्वत: ३२ इंच लांब चर खणून दाखवला. त्यावर जाळी व पत्रा ठेवून चूल बसवून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. विल्ये गावात प्रत्येक घरात जाळीच्या चुली बसवून संपूर्ण गाव धूरमुक्त करण्याचा निर्धार सरपंच मीना कांबळे यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. पर्यावरण रक्षण व निर्धूर चुली या दोन्ही गोष्टींमुळे गावात उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनयना धामणे, नीलम शितप यांच्यासह ७० पेक्षा अधिक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विल्ये गाव धूरमुक्त करणार
By admin | Published: August 26, 2014 9:14 PM