राजापूर : यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या सुत्रानुसार राजापूर पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राजापूर पंचायत समितीच्या पुढील सभापती पदासाठी कोंड्ये तर्फ सौंदळच्या सदस्य करुणा कदम तर उपसभापती पदासाठी पाचलच्या सदस्य अमिता सुतार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
राजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता असून, १२पैकी ९ सदस्य शिवसेनेकडून निवडून आले होते तर काॅंग्रेसकडून एक तर राष्ट्रवादीकडून दोन सदस्य विजयी झाले होते. मधल्या कालखंडात राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार यांनी पक्षाचा त्याग करुन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नी अमिता सुतार या पाचल पंचायत समिती गणातून निवडून आल्या होत्या. त्यांनीही पतीसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे संख्याबळ वाढून १० झाले आहे.
राजापूर पंचायत समितीचे सभापतीपद पहिल्या अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले होते तर पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले होते. शिवसेनेत तीन महिला सदस्य सभापती पदासाठी जोरदार आग्रही असल्याने प्रत्येकी आठ महिन्यांचा कालावधी तिघांना समान वाटून देण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्यानुसार पहिली संधी ओझर पंचायत समितीच्या सदस्य विशाखा लाड यांना देण्यात आली होती. त्यानंतर केळवली गणातील प्रमिला कानडे यांना दुसऱ्यावेळी संधी देण्यात आली हाेती. त्यांचाही कालखंड संपत आल्याने सभापती व उपसभापती बदलाचे वारे वाहू लागले आहेत.
पुढील वर्षी हाेणाऱ्या जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माेर्चेबांधणी सुरू आहे. आगामी निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून सभापती व उपसभापती यांचे राजीनामे घेऊन नवीन सदस्यांना संधी देण्याच्या विचारात पक्ष आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती बदल हाेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
तसेच ठरलेल्या सुत्रानुसार कोंड्ये तर्फ सौंदळ गणातील करुणा कदम यांना सभापतीपद तर पाचलच्या सदस्य अमिता सुतार यांना उपसभापतीपद देण्याचे ठरल्याची चर्चा आहे. मात्र, राज्यातील सत्तेत दोन्ही काॅंग्रेसची शिवसेनेशी महाविकास आघाडी असल्याने पंचायत समितीमध्ये उपसभापतीपद मिळावे, अशी मागणी दोन्ही काॅंग्रेसकडून गेल्यावेळी करण्यात आली होती. मात्र, पूर्ण सत्ता असलेल्या शिवसेनेने दोन्ही काॅंग्रेसच्या मागणीला अर्जुनाचा घाट दाखवला होता. त्यामुळे आता शिवसेना दाेघांपैकी एकाला संधी देणार की पुन्हा पदापासून लांब ठेवणार, हेच पाहायचे आहे.