दापोली : तालुक्यातील बुरोंडी बंदरात निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीने मच्छिमारांना चांगलाच दणका दिला. शनिवारी किनारपट्टी भागात झालेल्या वादळामुळे ४ बोटी उलट्या झाल्या. सुदैवाने खलाशांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. फयान वादळानंतर पहिल्यांदाच या वादळी स्थितीने पोटात भिती निर्माण केली होती, अशी प्रतिक्रिया मच्छिमारांनी बोलताना व्यक्त केली.
दक्षिणेकडून अचानकपणे आलेल्या वादळी वाºयामुळे शनिवारी दुपारी बुरोंडी बंदरातील किनारपट्टी भागात मच्छिमारी करणाºया चार पारंपरिक बोटी भरकटल्या. बोटीवरील ७ खलाशी समुद्रात बुडाले. सुदैवाने याच भागात असलेल्या काही मच्छिमारांना ही बाब समजली. त्यांनी एकेक खलाशाचा शोध सुरु केला. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सातही खलाशांना वाचवण्यात यश आले.
यामध्ये चार खलाशी जखमी झाले होते. त्यांना दापोलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर या चारहीजणांना सोडून देण्यात आले. समुद्र्रात अचानक फयानसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छिमार बांधवांचा एकच गोंधळ उडाला. या वादळामुळे लाखो रुपयाचे मच्छीमार बोटीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने खलाशी बचावले आहेत. फयान वादळासारखीच ही परिस्थिती होती. त्यामुळे फयान वादळाच्या आठवणी ताज्या झाल्या. बोट कलंडल्यानंतर क्षणभर काहीच कळाले नाही. आम्ही समुद्रात गटांगळ्या खाऊ लागलो. सुदैवाने किनारपट्टीतील नागरिकांनी तसेच समुद्रात असलेल्या मच्छिमारांनी पाहिले आणि त्यांनी आमचा जीव वाचवला नाहीतर आम्ही वाचूच शकलो नसतो, अशी प्रतिक्रिया बचावलेल्या खलाशांनी दिली.
बंदरात जेटी नसल्यामुळे वादळी वाºयाने वारंवार मच्छीमारांचे नुकसान होत आहे. झालं ते खूप झालं, सरकारने आता तरी लक्ष द्यावे. जेटीअभावी बुरोंडी बंदरातील मच्छिमार बांधवांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. फयानसारखा धोका टाळण्यासाठी जेटी होणे गरजचे आहे.-चंद्रकांत खळे,माजी अध्यक्ष, बुरोंडी मच्छीमार सोसायटी
समुद्र्रात वादळ झाल्यास बुरोंडी बंदरात बोटी लावण्यासाठी सुरक्षित जागा नाही , बोटी उभ्या करण्यासाठी दाभोळ किंवा हर्णै बंदरात घेऊन जावे लागते, मात्र मध्येच वादळाने गाठल्यास मोठी हानी होत आहे. फयान वादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, आतासुद्धा खूप नुकसान झालं आहे.-महादेव बेंदरकर,उपाध्यक्ष, बुरोंडी मच्छीमार सोसायटी.
शनिवारच्या वादळी थरारनाट्यात काही स्थानिक मच्छिमार बांधवांमुळे खलाशी सुदैवाने बचावले आहेत. कोकणातील मासेमार मत्स्यदुष्काळसारख्या परिस्थितीचा सामना करत असताना दुसरीकडे मात्र, अचानक दक्षिणेकडून आलेल्या वादळांमुळे मासेमारी व्यवसाय ठप्प असून मासेमारी बोटी किनाºयावर नांगर टाकून उभ्या आहेत.-राजन काळेपाटील, मच्छीमार, बुरोंडी
समुद्र्रात फयानसारखं वादळ निर्माण झालं होत. या वादळामुळे आमची बोट उलटली. आम्ही समुद्रात कोसळलो. स्थानिक मच्छिमारांनी आम्हाला मदतीचा हात दिला. नाहीतर... विचारच करवत नाही.-केशव पाटील, जखमी मच्छीमार