मंडणगड : शेताच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या खंड्याला मुक्त करण्यात मंडणगड तालुक्यातील वेळास येथे पक्षीप्रेमींना यश आले. दुर्मीळ हाेत चाललेल्या खंड्या जातीच्या पक्ष्याला जीवनदान देण्याचे समाधान यावेळी सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत हाेते.
वेळास येथील विभा दरीपकर यांच्या शेतात भातरोपांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात पांढऱ्या छातीचा खंड्या म्हणजेच धीवर पक्षी अडकला होता. सकाळी शेतात आल्यानंतर पाहिले असता, त्याची त्यातून सुटण्याची धडपड सुरू होती. त्यात तो आणखी गुरफटून जात होता. जवळ जावून पाहणी केल्यानंतर त्याचे दोन्ही पंख व एक पाय जाळ्यात अडकला होता. त्याची सुटकेसाठी चाललेली केविलवाणी धडपड पाहून दरीपकर यांनी सुरीने जाळी कापून त्याचे पाय व पंख मोकळे केले. यावेळी दमलेल्या पक्ष्याला पाणी पाजण्यात आले. तसेच औषधोपचार करून मोकळ्या जागेत ठेवल्यानंतर त्याने थोड्या वेळाने मोकळ्या वातावरणात भरारी घेतली. खंड्या सुखरूप उडून गेल्याने झालेला आनंद अवर्णनीय असल्याचे दरीपकर यांनी सांगितले.