चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे दोन गाड्या जाळण्यात आल्याच्या घटनेनंतर पोलीस तपासाअंती एका महिलेने पूर्ववैमनस्यातून हे कृत्य केले असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी त्या महिलेला पोलिसांनी अटक केली असून, तिला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे ही महिला व संबंधित गाड्या मालक हे नातेवाईक असल्याचे पुढे येत आहे.
उत्तरा वसंत शिंदे (५७, मार्गताम्हाणे) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
अजित वसंत साळवी (मार्गताम्हाणे) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीच्या या दोन गाड्या आहेत. त्या जाळण्यात आल्याने साळवी यांचे ४ लाखांचे नुकसान झाले आहे. साळवी यांनी त्यांच्या मालकीच्या घराच्या खाली पत्र्याच्या शेडमध्ये दुचाकी व चारचाकी या दोन गाड्या पार्किंग करून ठेवल्या होत्या. उत्तरा शिंदे हिने १९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ववैमनस्याचा राग मनात धरून कोणत्यातरी ज्वालाग्राही पदार्थाचा वापर करून आग लावून जाळल्या, असे या तपासात पुढे आले आहे. त्यात सौरभ चंद्रकांत चव्हाण याच्या मालकीचे किराणा मालाचे दुकानासमोरील इलेक्ट्रिक मीटर व वायरिंग तसेच पत्र्याच्या शेड तसेच चिपळूण अर्बन बँकेचे शटरच्या वरच्या लाकडी बोर्ड व इलेक्ट्रिक मीटर जळाले आहे.
हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरू केला. यातच सीसीटीव्ही फुटेजमधील महिला ही उत्तरा शिंदे असल्याचे पुढे येताच पोलिसांनी तिला ताब्यात घेत चौकशी केली. या प्रकरणी शिंदे हिला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. शिंदे ही साळवी याची नातेवाईक असून तिने हे कृत्य कोणत्या रागातून केले हे तपासअंती पुढे येणार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मन्सूर मणेर, समद बेग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, पोलीस नाईक दिलीप जाणकर, अजित कदम आदींच्या पथकाने केली.