खेड : तालुक्यातील दाभीळ खाणवाडी येथील एका महिलेच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी करत तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडल्याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सखू दामू राठोड (४५, रा. दाभीळ खाणवाडी, मूळ गाव विजापूर, कर्नाटक) हिने तक्रार दिली आहे. दाभीळ खाणवाडी येथील रामचंद्र बोले यांच्या घरात त्या भाडेतत्त्वावर राहतात. दिनांक १७ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणारे मोहन राठोड, महादेवी राठोड व रेश्मा राठोड (सर्व रा. दाभीळ खाणवाडी) यांच्या घरासमोर कचरा टाकण्याच्या किरकोळ विषयावरून वाद निर्माण झाला.
यावेळी मोहन राठोड यांनी सखू राठोड हिच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले तर महादेवी राठोड हिने सखूच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच मोहन व रेश्मा राठोड यांनी सखू हिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडले. याप्रकरणी खेड पोलिसांनी मोहन राठोड, महादेवी राठोड व रेश्मा राठोड यांच्या विरोधात गुन्हा दखल केला आहे. याबाबत अधिक तपास हवालदार चरणसिंग पवार करत आहेत.