रत्नागिरी : शहरानजीकच्या शिरगाव तिवंडेवाडी येथील २८ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. फिरदोस मुस्तफा उशेय (अजीजा अपार्टमेंट, शिरगाव तिवंडेवाडी) असे या महिलेचे नाव आहे.
फिरदोस उशेय हिने भाड्याची खोली घेतली होती; मात्र ती आपल्या मुलासह आईकडे कीर्ती नगर येथे राहत होती. नोकरीनिमित्त तिचा नवरा कुवेत येथे आहे. मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तिने आईला भाड्याच्या खोलीचे लाईट बिल घेऊन येते, असे सांगितले आणि ती खोलीवर गेली; मात्र रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान ती गळफास घेतलेल्या अवस्थेत तिच्या आईला रशिदा पागारकर (५५, कीर्ती नगर) यांना आढळले. त्यांनी शहर पोलीस स्थानकाला खबर दिली.
फिरदोसच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक अनिल लाड, उपनिरीक्षक चव्हाण, भगवान पाटील, नाईक वीर यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव करीत आहेत.