रत्नागिरी : नोकरीचे आमिष दाखवून ४० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी जिल्ह्याबाहेरील एका महिलेचा समावेश असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे या फसवणुकीचा आकडा आता कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या महिलेच्या समावेशाने या प्रकरणातील गुंता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी काही नागरिकांनी पोलिसांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यात कामाला लावतो, असे सांगून मलकापूर येथील १२ जणांना ४० लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात परितोष बिर्ला याच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटकही करण्यात आली होती. या पैशातून त्याने खरेदी केलेली बीएमडब्ल्यू आलिशान कार पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच परितोष बिर्ला याचे नाव बनावट असल्याची बाब पुढे आली आहे. सध्याच्या त्याच्या नावाची कोणतीच कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्यांच्या शाळेपासूनच तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पोलिसांनी आपली यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी एका महिलेचा समावेश असल्याची बाब पुढे आली आहे. या महिलेनेही नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेतल्याचे पुढे येत आहे. ही महिला जिल्ह्णाबाहेर असल्याचे सांगण्यात येत असून, तिला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तयारी केली आहे. या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. नोकरीच्या आमिषाला भुलून फसलेल्या गुन्ह्याचे खरे स्वरूप उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
नोकरी फसवणूक प्रकरणात महिलेचा समावेश?
By admin | Published: September 16, 2016 11:34 PM