khed-photo31 मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणीनजीक रस्त्याच्या बाजूचे लोखंडी रेलिंग मोटार धडकल्यावर मोटारीतून असे आरपार गेले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून माेटार रस्त्याच्या बाजूच्या रेलिंगवर धडकून अपघात झाल्याची घटना शनिवारी (३ राेजी) पहाटे ५ वाजण्याच्या सुमाराला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कळंबणी गावानजीक घडली. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
चिपळूण तालुक्यातील निर्व्हाळ येथील रहिवासी प्रफुल्ल रामचंद्र मोरे (४८), परिचय प्रकाश सावंत (३२), येणूबाई कृष्णा सावंत (८०), रोहित सुरेश वरवाटकर (३७, सर्व रा. सावर्डे) व प्रकाश जयराम सावंत (६९, रा. निर्व्हाळ, चिपळूण) हे इको मोटार (एमएच ०१, सीव्ही ५८०३) मधून शनिवारी मुंबई येथून खेडच्या दिशेने येत हाेते. मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणीनजीक पहाटे ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास गाडी आली असता चालक राघू गणपत पेडणेकर (४६, रा. कोळीवाडा, वरळी, मुंबई) यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून मोटर रस्त्याच्या बाजूला लोखंडी रेलिंगवर धडकली. या अपघातात मोटारीतून प्रवास करणाऱ्या येणूबाई कृष्णा सावंत (८०, रा. निर्व्हाळ, चिपळूण) या गंभीर जखमी होऊन त्यांचा कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम, कर्मचारी रवींद्र बुरटे आदींसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे.