रत्नागिरी : शासनाने सर्व कार्यालयांतील महिलांसाठी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे आदेश दिले असले तरी अजूनही अनेक कार्यालयांमध्ये अशा समिती कार्यरत आहेत, याची माहिती संबंधित कार्यालयातील महिलांनाच नसल्याचे निदर्शनास आले आहे.अनेक कार्यालयांमधील महिलांना सहकारी पुरूष वर्गाकडून हिणकस वागणूक मिळत असल्याचे निदर्शनास येते. तसेच अनेकदा महिलांचे कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळतात. मात्र, याबाबत न्याय मिळेल की नाही, या भीतीने संबंधित महिला वरिष्ठ स्तरावर न्याय न मागता गप्प बसते. त्यामुळे महिला वर्गाला अशा अनेक प्रकारांना सामोरे जावे लागते.महिलांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना निर्भयपणे काम करता यावे, त्यांना अशा प्रसंगांचा सामना करता यावा, यासाठी काही वर्षापूर्वी शासनाने सर्व कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन केली असून, या समितीच्या अध्यक्षस्थानी संबंधित कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकारी हिची नियुक्ती केली जाते. तसेच या समितीत सामाजिक महिला कार्यकर्तीचाही समावेश असतो. शासनाने ही समिती स्थापन करण्याचे आदेश देतानाच स्थापन केलेल्या या समितीची यादी कार्यालयाबाहेर लावण्यास कायद्याने बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक कार्यालयांमध्ये या समिती केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली अशी महिला तक्रार निवारण समिती स्थापन झालेली असली तरी त्याची यादी शाळेच्या प्रथमदर्शनी लावलेली दिसत नाही. एखाद्या शिक्षिकेवर अन्याय झाल्यास ती या समितीकडे न्याय मागण्यास गेली तर तिला न्याय न मिळता तिने तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दडपण आणण्याचाच प्रयत्न होेत असल्याचे काही ठिकाणी दिसून आले आहे.अनेक महिलांना आपल्या कार्यालयात किंवा कामासाठी जावे लागत असलेल्या अन्य कार्यालयांमध्ये महिलांवरील अन्यायासाठी दाद मागण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती कार्यरत आहे, याविषयीच माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे महिलांपर्यंत या समितीची माहिती नसेल तर या समितीचा उपयोग काय, असा सवाल निर्माण होत आहे. याबाबत जनजागृतीची वेळ आता येऊन ठेपली आहे. (प्रतिनिधी)कार्यशाळा हवी : जनजागृती करणे गरजेचेस्वत:च्या कार्यालयात अथवा कामासाठी गेलेल्या अन्य कार्यालयात असे विचित्र अनुभव आले तर त्याबाबतची दाद तेथील कार्यरत असलेल्या महिला तक्रार निवारण समितीकडे करण्यात येते, हेच अनेक महिलांना माहीत नाही. अनेक महिला असे अनुभव आल्यानंतरच कुणाकडे तक्रार करायची, असं विचारतात. याबाबत संबंधित विभागाने वेळोवेळी जागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यशाळा, मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जावेत.- श्रद्धा कळंबटे, अध्यक्षा स्वयंसेतू , रत्नागिरीमहिलांवर अन्याय..कार्यालयाच्या ठिकाणी महिलांवर अन्याय होतो. या अन्यायाबाबत अनेक महिला गप्प राहतात. त्यामुळे याबाबतही जागृती होणे गरजेचे आहे.
‘तक्रार निवारण’बाबत महिलाच अनभिज्ञ
By admin | Published: May 04, 2016 9:42 PM